लाइव न्यूज़
खा.दिलीप गांधी आणि मुलावर खंडणीचा गुन्हा दाखल होणा
Beed Citizen | Updated: February 24, 2018 - 3:00pm
अहमदनगर (वृत्तसेवा) अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिलीप गांधी यांच्यासह त्यांचा नगरसेवक मुलगा सुवेंद्र गांधीवर खंडणीचा गुन्हा दाखल करुन सीआयडी चौकशीचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिली आहेत. गांधी पिता-पुत्रांसह चौघांची सीआयडी चौकशी केली जाणार आहे.
हायकोर्टाच्या खंडपीठाने नगरच्या शोरुम मालकाच्या याचिकेवर आदेश दिले आहेत. या प्रकरणी फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार दिलीप गांधी यांच्यासह मुलगा सुवेंद्र गांधीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी २४ तासात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे न्यायालयाचे निर्देश आहे.
२०१४ साली खासदार गांधी यांनी बिहाणी यांच्या फोर्ड शोरुममधून इन्डेवर कार खरेदी केली होती. मात्र यानंतर गांधी यांनी सप्टेंबर महिन्यात गाडीच्या परफॉर्मन्स बाबत तक्रार केली. या प्रकरणी जून २०१५ साली सुवेंद्र गांधींनी सहकार्यांच्या मदतीने शोरुमधील मॅनेजरचं अपहरण केलं. त्याचबरोबर मारहाण करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. तर खासदार दिलीप गांधी यांनी खासदार पदाचा वापर करुन माझ्याबाबत मंत्री आणि आयकर विभागाला तक्रार केल्याची बिहाणी यांची याचिका आहे. नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली, मात्र काहीच आढळून न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे बिहाणी यांनी न्यायालयात धाव घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयान या प्रकरणी सबंधीतांवर २४ तासात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचं रस्त्यावर अतिक्रमण आहे. या प्रकरणी औरंगाबाद न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेकडून बंगल्याची मोजणी करण्यात आली. लवकरच यावर निर्णय होणार आहे.
Add new comment