लाइव न्यूज़
चारा छावणी घोटाळ्याचे गुन्हे आठवड्याभरात नोंदवा, हायकोर्टाचे आदेश
Beed Citizen | Updated: February 24, 2018 - 2:59pm
मुंबई (वृत्तसेवा) दुष्काळात राज्यभरात लावण्यात आलेल्या चारा छावणीत झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी आठवड्याभरात गुन्हे दाखल करा असे, निर्देश मुंबई हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. कारवाई करण्यात दिरंगाई करणार्या पोलीस अधिकार्यांवर कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करू, अशी तंबीही हायकोर्टाने दिली.
याशिवाय यासंदर्भात जर कुणी कारवाईपासून बचावासाठी कनिष्ठ न्यायालयात धाव घेईल, तर त्यांना खालच्या कोर्टाने कोणताही दिलासा देऊ नये, असंही हायकोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. दुष्काळाच्या काळात २०१२, २०१३ आणि २०१४ साली पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ यांसारख्या दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या भागांत जनावरांसाठी ठिकठिकाणी चारा छावण्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र या चारा छावण्यांच्या आयोजनातही मोठा आर्थिक घोटाळा झाल्याच्या अनेक तक्रारी येऊनही राज्य सरकारकडून कारवाई का झाली नाही, असा सवाल हायकोर्टाने विचारला. राज्यभरातील १२७३ चारा छावण्यांपैकी १०२५ चारा छावण्यात सुमारे २०० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वकील आशिष गायकवाड यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी सध्या न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर होणार्या सुनावणीत राज्य सरकारला केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Add new comment