सालगड्याने पैसे मागितले म्हणून मालकाने केली मारहाण
तोंडात लघुशंका करून जातीवाचक शिवीगाळ; जिल्हा कचेरीसमोर न्याय मागणीसाठी उपोषण
बीड (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील दैठणा येथील एका दलित समाजातील सालगड्याला त्याच्या मालकाने पैसे मागितले म्हणून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला शेतात नेवून मारहाण करत त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली. जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही सर्व हकीकत त्या दलित सालगड्याने पोलिसांना सांगितली. परळी पोलिस ठाण्यात तक्रार देवूनही या प्रकरणी आरोपींना अटक न झाल्याने पिडीत सालगड्याने जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले आहे. मात्र तीन दिवस उलटूनही प्रशासन उपोषणाकडे लक्ष देत नसल्याने नेमकी दाद मागायची कुठे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
दैठणा येथील प्रल्हाद श्रीराम गुठ्ठे यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून दहा वर्षापासून खंडू रामकिसन उदारे हे काम करत आहेत. दोन वेळचे जेवण आणि बाजाराला किरकोळा पैसे देवून गुठ्ठे त्यांना शेतात राबवतात असा आरोप उदारे यांनी केला आहे. मुलगी आजारी पडल्यामुळे दवाखान्यासाठी पैसे मागितले म्हणून मालकाने उदारे यांना गावातून धिंड काढत मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून अश्लील शिव्यादेखील दिल्या. येथेच न थांबता गुठ्ठे यांनी उदारे यांना ‘तु जी तक्रार दिलीस त्याने आमचे काही वाकडे होणार नाही’ असे म्हणत गाडीवर बसवून शेतामध्ये नेले. यानंतर पुन्हा उदारे यांना लाथाबुक्याने मारहाण केली. उदारे यांनी पाणी पाजा असे म्हटले असता हनुमान गुठ्ठे आणि प्रल्हाद गुठ्ठे यांनी उदारे यांच्या
तोंडात लघुशंका केल्याचा प्रकार घडला. यानंतर उदारे यांनी सदर हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. जवाब नोंदवून उदारे यांना एफआयआरची प्रत दिली नाही. त्यानंतर गुठ्ठे यांनी पुन्हा उदारे यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरूवात केल्याने उदारे हे त्या भितीने गावाकडे सुध्दा जावू शकत नाही. सदरिल लोक उदारे यांना जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले असून गेल्या तीन दिवसापासून जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार सदरिल आरोपींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी ते उपोषणास बसले आहेत.
Add new comment