लाइव न्यूज़
महाराष्ट्राचा इज्तेमा; स्वयंसेवकांची यंत्रणा सज्ज
Beed Citizen | Updated: February 22, 2018 - 3:28pm
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचा इज्तेमा औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे होत आहे. शनिवारपासून सुरू होणार्या तीन दिवसीय इज्तेमासाठी सर्वठिकाणच्या स्वयंसेवकांची यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या शुक्रवारपासूनच राज्यभरातील मुस्लिम बांधव औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. इज्तेमास्थळी सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. बीड जिल्ह्यातूनही लाखोंच्या संख्येने समाजबांधव औरंगाबादला रवाना होणार आहे.
महाराष्ट्राचा इज्तेमा दि.२४, २५, २६ रोजी औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे होत आहे. उद्या शुक्रवारपासूनच राज्यभरातील मुस्लिम बांधव औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार असून ठिकठिकाणी संबंधीत बांधवांची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यामध्ये कोठेही गैरसोय होवू नये याची खबरदारी घेतली जात आहे. अल्पोपहार, जेवणासह ठिकठिकाणी नमाजची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणचे मुस्लिम स्वयंसेवक सज्ज झाले असून तीन दिवसात राज्यभरातील लाखो समाजबांधव औरंगाबाद-लिंबेजळगावमध्ये येणार असल्याने त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद येथील डॉक्टरांनी इज्तेमास्थळी तात्पुरते रूग्णालय उभारले आहे. उपचारासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा त्याठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. खाण्याची आणि अन्य साहित्याचीही चोख व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हानिहाय पार्किंग एरिया ठरवून दिला असून प्रत्येक जिल्ह्याला विशिष्ठ क्रमांक देण्यात आला आहे. वाहनधारकांची अडचण होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. तीन दिवसीय इज्तेमाला शनिवारपासून सुरूवात होणार असल्याने उद्या दुपारपासून हजारो समाजबांधव औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार असल्याने त्यादृष्टीने तयार करण्यात आली आहे. शनिवार, रविवार दोन दिवस धार्मिक व्याख्यान झाल्यानंतर सोमवार दि.२६ फेब्रुवारी रोजी सामुहिक दुवा होवून इज्तेमाचा समारोप होणार आहे. राज्यभरातून मुस्लिम समाजबांधव येणार असल्याने ठिकठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत. त्याची जबाबदारी त्या-त्या ठिकाणच्या समाजबांधवांनी घेतली आहे.
Add new comment