पोलिस अधिकार्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ; २० हजार रूपये मिळणार
बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र संवर्गातील भारतीय पोलिस सेवेतील अधिकार्यांच्या गणवेश भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. प्रतिवर्ष १४ ऐवजी त्यांना आता २० हजार रूपयांचा भत्ता मिळणार असून त्यासंबंधीचे शासनादेश गृहविभागाने आज निर्गमित केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील पोलिस अधिकार्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाच्या गृहविभागाने आज आदेश निर्गमित केले असून भारतीय पोलिस सेवेतील अधिकार्यांना सुधारित दराने गणवेश भत्ता मंजुर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस सेवेतील अधिकार्यांना यापूर्वी देण्यात येणार्या गणवेश संबंधी भत्त्यात कपडे, किट मेंटनंस, बुट आदींसाठी प्रतिवर्ष १४ हजार रूपये गणवेश भत्ता देण्यात येत होता. सदरील गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधिन होता. यासंदर्भात आज शासनादेश निर्गमित करत पोलिस अधिकार्यांचा गणवेश भत्ता १४ ऐवजी सरसकट २० हजार रूपये प्रतिवर्ष करण्यात आला आहे. सुधारित भत्त्याचा निर्णय १ जुलै २०१७ पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली असून आतापर्यंतचा सर्व ङ्गरक संबंधीत पोलिस अधिकार्यांना मिळणार आहे. भारतीय पोलिस सेवेतील अधिकार्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दरवेळी ५० टक्क्याने वाढ झाल्यावर गणवेश भत्ता दरात २५ टक्क्याने वाढ करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
Add new comment