इज्तेमा परिसराची प्रशासनाच्यावतीने पाहणी इज्तेमासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य-विभागीयआयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर
औरंगाबाद (प्रतीनीधी.)-लिंबे जळगाव येथे 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या इज्तेमासाठी आयोजकांनी उत्तम नियोजन केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आयोजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितले.
लिंबे जळगांव येथील कार्यक्रमस्थळांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. यावेळी मुख्य आयोजक सोहेममुल्ला, एकबाल देसाई तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
या पाहणीनंतर आयोजक मंडळ आणि जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली.
सर्वप्रथम मुख्य संयोजक सोहेममुल्ला इज्तेमा आयोजनामागची पार्श्वभूमी सांगताना म्हणाले की, प्रत्येक 10 वर्षानंतर या इज्तेमाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी मालेगांव येथे हा कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमापेक्षा अधिक भाविक येथे येणार असून या सर्व भाविकांसाठी राहण्याची, खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षेविषयी बोलतांना पेालिस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले की, या कार्यक्रमासाठी 5 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयोजकांच्यावतीने 5 हजार स्वयंसेवक देखील सुरखेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही देखील लवकरच लावण्यात येणार असून पूर्ण कार्यक्रमावर 4 ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील नजर ठेवण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशसनाचे पथक येथे तैनात करण्यात येणार असल्याचेही श्री. यादव म्हणाले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीमध्ये जिल्हा प्रशासनासोबतच आयोजकांची देखील भूमिका महत्वाची आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण देण्यासाठी 22 तारखेला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांना हिरीरीने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे असल्याचेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.
Add new comment