बीड जिल्हा विभाजनाचा प्रश्न जटील ! अंबाजोगाईनंतर परळीतुनही जिल्हा निर्मितीची मागणी परळी जिल्हा निर्मितीसाठी भाजप कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन
बीड ( प्रतिनिधी ) जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावरून आता अंबाजोगाई आणि परळीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीला जोर आलेला असतानाच आता परळी वैजनाथ जिल्हा म्हणून घोषित करा अशा मागणीचे निवेदन भाजप कार्यकर्त्यांनी आज तेथील तहसिलदारांना दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यासाठी परळीच योग्य असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाला वेग आलेला असतानाच परळीकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विभाजनाचा प्रश्न जटील होण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय व इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने शासनाने परळी शहराला जिल्हयाचा दर्जा द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज तहसीलदारांना भेटून यासंदर्भात एक निवेदन दिले असून गेल्या अनेक वर्षांपासूनची जिल्हा निर्मितीची मागणी तातडीने पूर्ण करावी असे निवेदनात म्हटले आहे. भाजप व भाजयुमोच्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी आज दुपारी तहसील कार्यालयात जावून परळी जिल्हा घोषित करावा या मागणीचे निवेदन सादर केले. तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार बरदाळे यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी कार्यकर्त्यांनी परळी जिल्हा निर्मितीच्या घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले.
परळी वैजनाथ शहराला जिल्हयाचा दर्जा द्यावा ही येथील जनतेची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. जिल्हयासाठी लागणारे सर्व सुविधा व पोषक वातावरण याठिकाणी आहे. वीज केंद्र, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्ग यामुळे याठिकाणी उद्योग व व्यापार वाढीला मोठी चालना मिळाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना व त्याच्याशी संलग्न असलेले वीज निर्मिती प्रकल्प, डिस्टीलरी यामुळे साखर उत्पादन होण्याबरोबरच शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरूणांना आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे. शहर व तालुक्याचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व क्रीडा विषयक वातावरण अतिशय चांगले असून अनेकांनी आपापल्या क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करून शहराचा नावलौकिक वाढवला आहे. परळी हे सध्या तालुक्याचे ठिकाण असले तरी कापूस उत्पादक पणन महासंघ, पाटबंधारे विभागाचे व अन्य काही विभाग स्तरावरचे कार्यालय याठिकाणी आहेत. शहर व तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न आहे. वाण धरणात सदैव मुबलक पाणी असल्याने पाण्याची टंचाई या भागाला अजिबात जाणवत नाही. सध्या या शहराला असलेले बीड हे जिल्हयाचे ठिकाण शंभर किमी दूर व प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अतिशय गैर सोयीचे व त्रासदायक आहे. त्यामुळे जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने हे शहर भौगोलिकदृष्ट्या व जनतेच्या सोयीसाठी योग्य आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, राजेश गिते, प्रकाश जोशी, अरूण टाक, प्रा. दासू वाघमारे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, उमाताई समशेटे, राजेंद्र ओझा, महादेव ईटके, रवि कांदे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मेनकुदळे, मोहन जोशी, सचिन गिते, नितीन समशेटे, अरूण पाठक, अनिश अग्रवाल, योगेश पांडकर, गोविंद चौरे, गणेश होळंबे, फैसल कुरेशी, स. जहीर, रमेश गायकवाड, तानाजी वाव्हळे, वैजनाथ ताटीपामल, अविनाश मुंडे, शेख अनीस, नरेश पिंपळे, निलेश जाधव, शेख खदीर, अशोक तरकसे, स. यासीन, नरसिंग सिरसाट, प्रल्हाद सुरवसे, राहूल लेणेकर, अर्जून देवकर, शेरूभाई, शेख पाशा, कमलाकर हरेगांवकर, आश्विन मोगरकर, दिलीप नेहरकर, वैजनाथ रेकणे, स्वप्नील वेरूळे, जरीचंद्र मस्के, मंजाहरी खडके, जमील टेलर, सतीश केंद्रे, बंडू कोरे, धनराज गिते, संजय रणखांबे, बाळासाहेब दराडे, विजय दहिवाळ, जितेंद्र मस्के, अशोक आघाव, अफरोज पठाण, तेजस आघाव, मधुकर मुंडे आदीसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हयासाठी परळीच योग्य असल्याचा दावा !
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले बीड जिल्हयातील परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध शहर आहे. महाराष्ट्राची काशी म्हणूनही याची ओळख आहे. परळीला असलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून तयार होणा-या वीजेचा राज्यासह संपूर्ण देशाला पुरवठा होतो. दळणवळणाच्या दृष्टीने याठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, ज्यामुळे शहराचा इतर राज्यातील प्रमुख शहरांशी आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दैनंदिन संपर्क साधला जातो. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर हे शहर आता आले असून शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत, ही शहर विकासाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे.
Add new comment