लाइव न्यूज़
बीड जिल्ह्याकडे गुंतवणूकदारांची पाठ ! मॅग्नेटिक महाराष्ट्रकडूनही उपेक्षाच रेल्वेसह अन्य प्रभावी साधने नसल्याचा फटका ;
Beed Citizen | Updated: February 21, 2018 - 3:28pm
नांदेड 200 कोटी , हिंगोली सव्वासे कोटी,
औरंगाबाद 1250 कोटी तर लातुरात 600 कोटींचा रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प
बीड ( प्रतिनिधी ) राजकीय इच्छाशक्तीचा अभाव , शासनाची उदासीनता आणि प्रशासनातील दिरंगाईमुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला विकास जिल्ह्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरू लागला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र या महत्वकांक्षी उपक्रमातूनही बीडच्या पदरी उपेक्षाच आली आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी बीडकडे पाठ फिरवली असून रेल्वेसह दळणवळणाची अन्य साधने नसल्याने या जिल्ह्यात गुंतवणूक करण्यास कंपन्यांनी हात आखडता घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमातंर्गत तब्बल 12 लाख 10 कोटींची गुंतवणूक होत असून चार हजारांपेक्षा अधिक सामंजस्य करार झाले आहेत. यामुळे लाखो रोजगार उपलब्ध होतील असा दावा सरकारने केला आहे. या करारांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार असून मराठवाड्यातही मोठी गुंतवणूक होत आहे. औरंगाबाद 1250 कोटींचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. नांदेड येथे 200 कोटींचा इंडिया ऍग्रो अनाज प्रकल्प करण्यात येत आहे. हिंगोलीत 125 कोटी रुपये खर्च करून ऍग्रो प्रकल्प उभारण्यासाठीचा करार या उपक्रमातून झाला आहे. लातूर येथेही 600 कोटींचा रेल्वे डबे निर्मितीचा अतिभव्य प्रकल्प उभारण्यात येणार असून तेथे तयार होणारे डबे जगात पोहचतील असा दावा करारा दरम्यान करण्यात आला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मोठे प्रकल्प येणार असल्याने रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार हे निश्चित असले तरी या महत्वकांक्षी उपक्रमातून बीड जिल्ह्याच्या पदरी निराशा आली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत गुंतवणूकदारांनी मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये विशेष रुची दाखवत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र बीड जिल्ह्याच्या बाबतीत त्यांची विशेष अशी आवड दिसून आली नाही. प्रकल्प उभारणीसाठी आणि त्यानंतर त्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने दळणवळणाची फारशी प्रभावी साधने नसल्याने गुंतवणूकदारांनी बीडकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे. किमान रेल्वेची सुविधा असती तरी आज मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमातून एखादा प्रकल्प पदरात पडला असता आणि येथील बेरोजगारीचा प्रश्नही मार्गी लागला असता अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.
Add new comment