परिक्षार्थ्यांची शाळा ; सीईओ येडगे यांनीच घेतला पहिला तास ! बारावीचा पहिला पेपर सुरळीत ; येडगे पॅटर्नचा दरारा

बीड ( प्रतिनिधी ) बारावीचा परीक्षा आज पासून सुरू झाल्या. पहिल्याच पेपरला धडाकेबाज एन्ट्री करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी ’ येडगे पॅटर्न ’ चा दरारा दाखवून दिला. सर्वच केंद्रांवर अपवाद वगळता परीक्षा शांततेत आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरू होती. आज खर्‍या अर्थाने परिक्षार्थ्यांची शाळाच झाली सीईओ येडगे यांनी पहिला तास घेत गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. येडगे यांनी पहिल्या  तासाभरात शहरातील अनेक केंद्रांना भेटी देत प्रशासन सतर्क असल्याचे दाखवून दिले.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबादच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परिक्षेला आज बुधवारपासून सुरूवात झाली आहे. भाषा विषयाचा इंग्रजीचा पेपर आज सकाळी ११ ते २ या वेळेत पार पडला. जिल्ह्यात या परिक्षेसाठी जिल्ह्यात ९० परिक्षा केंद्र असून या ठिकाणी विज्ञान शाखेचे १९ हजार ९८८, वाणिज्य शाखेचे २ हजार ४०३ तर कला शाखेचे १४ हजार ७५९ तसेच एमसीव्हीसी अभ्यासक्रमाचे १ हजार ६८८ असे एकुण ३८ हजार ८३८ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. प्रत्येक केंद्रावर जि.प.व महसुल विभागाच्या क्लासवन व क्लासटू अधिकार्यांची बैठे पथक कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यात ९० केंद्र संचालकांबरोबर १४ कस्टोडीएन नियुक्त केले आहेत. या बरोबरच ६ नियमीत भरारी पथकेही परिक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व  सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडचे  जिल्हादंडाधिकारी  यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये केंद्र व त्याच्या २०० मीटर परिसरात दि.२१ फेब्रुवारी ते २४ मार्च २०१८ या कालावधीत इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या परीक्षा असल्याने बीड जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत मनाई आदेश जारी केला आहे.
पुणे , सातार्‍याचे विद्यार्थीही काही केंद्रांवर परीक्षार्थी !
 बीड जिल्ह्यातील काही केंद्रांवर चक्क पुणे , सातारा परिसरातील परीक्षार्थी दिसून आले आहेत. पाटोदा तालुक्यातील एका केंद्रावर असे जिल्ह्याबाहेरील परीक्षार्थी आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आशा प्रकाराकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
जिल्ह्यात एकूण भरारी पथक ६
एक विशेष महिला पथक
प्रत्येक केंद्रावर वर्ग १ आणि वर्ग २ राजपत्रीत अधिकारी
कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने भरारी पथक नेमण्यात आले.
बैठक पथक प्रत्येक केंद्रावर
 
राज्यात बीडला वेगळा नियम कसा?
विद्यार्थ्यांनो परिक्षेला वेळेपूर्वी हजर रहा 
राज्यभरात बारावीच्या परिक्षेला आजपासून सुरूवात झाली असून गेल्या काही वर्षात घडलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उशीरा येणार्या विद्यार्थ्यांना परिक्षेला बसु न देण्याचा निर्णय राज्य मंडळांकडून घेण्यात आला आहे त्यामुळे परिक्षेच्या वेळेपूर्वीच विद्यार्थ्यांनी वर्गात पोहोचणे आवश्यक आहे असे असले तरी बीडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी मात्र विद्यार्थ्यांना परिक्षेला येण्यास उशीर झाला तरी केंद्र प्रमुख व बोर्डाच्या परवानगीने परिक्षा देता येण्याचा बदल झाला असल्याचे म्हटले आहे. वास्तविक राज्यात एक आणि बीडला वेगळा नियम कसा असु शकतो असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात असून मानसिक त्रास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून परिक्षेला वेळेपूर्वी हजर राहणे गरजेचे आहे.
 
---------

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.