लाइव न्यूज़
महाराष्ट्राचा इज्तेमा; दुवाच्या दिवशीच बारावीचा पेपर! दि.२६ फेब्रुवारीचा पेपर पुढे ढकलण्याची मागणी
Beed Citizen | Updated: February 20, 2018 - 3:35pm
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचा तीन दिवसीय इज्तेमा दि.२४ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे होत आहे. तिसर्या म्हणजे दुवाच्या दिवशीच बारावीचा पेपर आहे. त्यामुळे हजारे मुस्लिम विद्यार्थ्यांना दुवासाठी इज्तेमास्थळी उपस्थित राहता येणार नसल्याने त्यादिवशीचा पेपर पुढे ढकलून अन्य दिवशी घ्यावा अशी मागणी होवू लागली आहे.
औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे दि.२४, २५, २६ रोजी राज्य इज्तेमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून इज्तेमाची तयारी सुरू असून लाखोंच्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. तीन दिवसीय इज्तेमामध्ये शेवटच्या दिवशी दि.२६ फेब्रुवारी रोजी विशेष दुवा होणार आहे. पहिल्या आणि दुसर्या दिवशीपेक्षा शेवटच्या दिवशी दुवाला उपस्थित राहणार्यांची संख्या लाखोंची असणार आहे. मात्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी परिक्षेच्या नियोजीत वेळापत्रकाप्रमाणे दि.२६ फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्राचा पेपर आहे. नियोजीत वेळापत्रकाप्रमाणे दि.२६ रोजी बारावीच्या पेपरमुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना राज्य इज्तेमाच्या दुवासाठी उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याची दखल घेवून दि.२६ फेब्रुवारीचा पेपर विशेष बाब म्हणून पुढे ढकलून तो पुढील तारखेत घ्यावा जेणेकरून मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना दुवासाठी इज्तेमास्थळी उपस्थित राहता येईल अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होवू लागली आहे.
Add new comment