नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून हिरे खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर

मुंबई (वृत्तसेवा) नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून रोखीने हिर खरेदी करणारे देशातील ५० ख्यातनाम उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटी आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. नीरव मोदीच्या कार्यालयांवरील छाप्यामुळे ही बाब समोर आली असून हे सर्व जण आता चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत.
पंजाब नॅशनल बँकेला सुमारे ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी हा मुख्य सूत्रधार आहे. या प्रकरणी सीबीआय आणि ईडीने नीरव मोदीविरोधात गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. नीरव मोदी कुटुंबीयांशी संबंधित २९ मालमत्ता आणि १०५ बँक खाती प्राप्तिकर खात्याने गोठवली असून त्याच्या घर व कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. या छाप्यांमधून तपास यंत्रणांना काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे वृत्त ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. ‘देशातील ख्यातनाम उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटींनी नीरव मोदीकडून रोखीने हिरे खरेदी केले. हे सर्व व्यवहार नोटाबंदीच्या काळात झाले होते’, असे वृत्तात म्हटले आहे. आयकर विभागाने आता या सर्वांची चौकशी करण्याची तयारी सुरु केल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, सोमवारी ईडीने नीरव मोदीच्या दक्षिण मुंबईतील वरळी येथील समुद्र महाल बंगल्यावर छापा टाकला. तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोलकाता, दिल्ली, लखनौ, बेंगळुरु आणि सुरत या शहरांसह देशभरात ३४ ठिकाणी छापे घातले होते. तर पंजाब नॅशनल बँकेच्या फोर्ट शाखेला सीबीआयने सोमवारी टाळे ठोकले. बँकेतील अनेक व्यवहारांमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळल्यानंतर सीबीआयने या बँकेला टाळे ठोकले. आता या शाखेतील कर्मचार्‍यांना मंगळवारी सीबीआयने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. या प्रकरणात सीबीआयने सोमवारी या शाखेतील तीन कर्मचार्‍यांना अटकही केली होती.दुसरीकडे नीरव मोदीने बँकेला पत्र पाठवले असून मी बँकेला फक्त ५ हजार कोटी रुपयांचे देणे लागतो. बँकेने कर्जाची रक्कम वाढवून सांगितली असून बँकेने प्रसिद्धीमाध्यमांकडे वाच्यता केल्यामुळेच कर्जफेडीचे मार्ग बंद झाला आहे, असे त्याने बँकेला कळवले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.