लाइव न्यूज़
पाच तालुक्यांमध्ये पाणीदार चळवळ बीडच्या जिल्हाधिकार्यांसमवेत आमिर खानची बैठक; पाणी फाऊंडेशन अंतर्गत कामांची चर्चा
बीड (प्रतिनिधी) अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वाटप कप स्पर्धेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश झालेला आहे. त्याअनुषंगाने दि.१९ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी आमिर खान यांच्याशी चर्चा केली. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत होत असलेल्या कामांप्रमाणेच स्पर्धेत सहभागी गावातही जास्तीत जास्त कामे व्हावीत अशी अपेक्षा आमिर खान यांनी व्यक्त केली आहे. आमिर खान यांच्याशी झालेल्या जिल्हाधिकार्यांच्या चर्चेमुळे जिल्ह्यातील गावे पाणीदार होण्यास गती मिळणार आहे.
बीड जिल्ह्यात केज, अंबाजोगाइ, धारू, परळी, आष्टी या पाच तालुक्यांमध्ये सत्यमेव जयते वाटप कप स्पर्धा २०१८ राबवण्यात येत आहे. ८ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान होत असलेल्या स्पर्धेत विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५, ५०, ४० लाख रोख पारितोषिक दिले जाणार आहे. याबरोबरच स्पर्धेत तालुक्यातून आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. बीड जिल्ह्याच्या सहभागाविषयी दि.१९ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पाणी फाऊंडेशनची बैठक झाली. या बैठकीत अभिनेते आमिर खान यांनी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्याशी चर्चा केली. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांमध्ये राबवण्यात येत असलेल्या योजनेप्रमाणेच पाणी फाऊंडेशनचीही कामे व्हावीत अशी अपेक्षा आमिर खान यांनी व्यक्त केली. त्यास जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सकारात्मकता दर्शवत जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने कामे करून सर्व गावे पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमिर खान आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्यामध्ये जिल्ह्यातील पाणीप्रश्न आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.
Add new comment