लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यातील ३९ हजार विद्यार्थ्यांची उद्यापासून परिक्षा मिशन बारावी; जिल्हाभर भरारी पथकांची संख्या वाढवली
बीड, (प्रतिनिधी): उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा अर्थात बारावीच्या परिक्षांना उद्या दि.२१ ङ्गेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. जिल्हाभरातील ९० केंद्रावर ३८ हजार ८३८ विद्यार्थी परिक्षा देणार असून कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा व्हाव्यात यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली असून अतिसंवेदनशिल केंद्रावर बैठे पथक राहणार आहे.
बीड जिल्ह्यातील ९० केंद्रावर उद्यापासून बारावीची परिक्षा सुरू होत आहे. विज्ञान शाखेतील १९ हजार ९८८, वाणिज्य- २ हजार ४०३, कला- १४ हजार ७५९ तर एमसीव्हीसी शाखेतून १ हजार ६८८ असे एकूण ३८ हजार ८३८ विद्यार्थी परिक्षा देणार आहे.दरम्यान राज्यात बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यावर्षी भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली असून ती २५२ करण्यात आली आहे. शिवाय उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर पहिल्यांदाच बारकोडची छपाई केली जाणार आहे. पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राज्यातील १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर संपूर्ण राज्यात २ हजार ८२२ परीक्षा केंद्र आहेत. कॉपीचे प्रकार घडू नयेत यासाठी राज्यभरात २५२ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ भरारी पथकं असतील.
Add new comment