शिवसेनेकडून जिल्ह्यात २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान शिवसंपर्क मोहीम
बीड-शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका शिवसेना पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत होणार आहेत. उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांनी आपल्या तालुक्यातील सर्व संघटनात्मक माहिती या बैठकांना पक्षनिरीक्षकांकडे सादर करावयाची असून सदरील बैठकांना शिवसेना पक्षपदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले आहे.
शिवसेनेकडून लोकसभा व विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभेतच झालेली आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान शिवसंपर्क मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये सदरील विधानसभेमधील शिवसेना कार्यकर्त्यांशी व्यक्तिशः अथवा एकत्रितरित्या चर्चा करून विधानसभा निवडणुकीसाठी काय काय करावे लागणार आहे, याबद्दलचा अहवाल बनवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६ विधानसभा क्षेत्रास २ गटांमध्ये विभागण्यात आलेले असून गेवराई, माजलगाव, बीड व आष्टी, केज, परळी असे गट पाडण्यात आलेले आहेत. प्रत्येक विधानसभेला संपूर्ण एक दिवस पक्षनिरीक्षक देणार आहेत.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांनी त्यांना देण्यात आलेल्या पत्रानुसार संबंधित विधानसभा क्षेत्राचा अहवाल पक्षनिरीक्षकांकडे विहित लेखी स्वरूपात नियोजित मोहिमेदिवशी सादर करावयाचा असून त्या विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सदरील बैठकीस उपस्थित राहून शिवसेनेच्या विधानसभा विजयासाठी आवश्यक बाबींचा संवाद पक्षनिरीक्षकांसोबत साधण्यासाठी सदरील मोहिमांच्या बैठकांना उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी प्रसिद्धिपत्रकांद्वारे केले आहे.
Add new comment