माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातील वाळुसह मुद्देमाल चोरीला
माजलगाव : येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील जप्त केलेला मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी शनिवारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मोहरील म्हणातात की तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी हा मुद्देमाल विकला तर अधिकारी म्हणतात हा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
दोघांच्या बोलण्यात तफावत आल्याने या चोरीचे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. असे असले तरी पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल चोरीला जाणे ही सुद्धा एक धक्कादायक बाब आहे.
माजलगाव येथील ग्रामीण पोलीस ठाणे हे शहरातील एका जुन्या इमारतीत कार्यरत होते. त्यावेळी विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला मुद्देमाल या ठिकाणी ठेवण्यात आला होता. काही महिन्यासंपूर्वी सदर पोलीस ठाण्याचे स्थलांतर केसापूरी कॅम्प भागातील नवीन इमारतीत झाले.
या काळात सप्टेंबर ते डिसेंबर २०१७ या काळात ठाण्यातील ३ लाख ३२ हजार रूपये किंमतीची ७१ ब्रास वाळू, ५० हजार रूपये किंमतीचा ट्रॅक्टर ट्राली, ५ हजार रूपये किंमतीचे जुने टायर, सीट, ४५ हजार रूपये किंमतीच्या दोन दुचाकी, ५८ हजार ५९० रुपयाची दारू, चारचाकी गाडीचे ५ हजार रूपयांचे इंजिन,असा ४ लाख ६६ हजार २२२ रूपयांचा मुद्देमाल गायब झाला. सदर मुद्देमाल परिसरात दिसून न आल्याने पोलीस कर्मचारी (मोहरील) आर. डी. सिरसट यांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे लेखी तक्रार केली होती.
यावरून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना दिले होते. चौकशीअंती मुद्देमाल गायब असल्याचा अहवाल २० जानेवारी रोजी देऊन संबंधित कर्मचाºयाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात पोलीस कर्मचारी (मोहरील) सिरसट यांनी वरील सर्व लाखो रूपयांचा मुद्देमाल तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी काही लोकांशी संगनमत करून विक्री केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती; परंतु संबंधित अधिका-यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असे सिरसट यांचे म्हणणे आहे.
सदर मुद्देमाल तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी विक्री केला असल्याचे सदरील मोहरील सांगत असतानाही वरिष्ठ अधिकारी मात्र हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.
तत्कालीन निरीक्षकांची पाठराखण
तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी ठाण्यातील मु्द्देमाल विक्री केल्याची तक्रार देण्यास गेलेल्या मोहरील यांची तक्रार घेतली नाही. उलट हा मुद्देमाल चोरी गेल्याची नोंद केली आहे. विक्री केले काय आणि चोरी गेले काय? शेवटी पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल चोरी जाणे हे पोलिसांसाठी धक्का देणारी बाब आहे. या प्रकरणात वरिष्ठांकडून संजय पवार यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
Add new comment