विश्वासार्हता हेच पत्रकारितेचे वैभव - विजय दर्डा
पिंपरी-चिंचवड : विश्वासार्हता हेच पत्रकार आणि पत्रकारितेचे वैभव आहे. बातमीत तथ्य असेल तर पत्रकाराने निर्भीडपणे मांडावे. वृत्तपत्राचे नाते वाचकाशी असायला हवे. आजची माध्यमे दबावाखाली काम करीत आहेत, असे वाटत असून हे देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे पत्रकारांनी बातमीच्या माध्यमातून समाजाला सत्य तेच सांगावे, असे आवाहन लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १२ वे राज्यस्तरीय अधिवेशन भोसरीतील रामस्मृती लॉन्स येथे रविवारी झाला. या वेळी ते बोलत होते. विजय दर्डा यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जीवनगौरव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे यांना प्रदान करण्यात आला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पगडी, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, पत्रकार संघाचे संस्थापक व संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, कार्याध्यक्ष वसंत मुंढे, सरचिटणीस विश्वास आरोटे, उपाध्यक्ष सोमनाथ देशकर, माजी नगरसेवक पंडित गवळी, योगेश गवळी, संदीप भटेवरा आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे लाडके बाबा अर्थात मुरलीधर शिंगोटे यांना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक, परमश्रद्धेय जवाहरलालजी दर्डा पुरस्काराने सन्मानित करताना मला विशेष आनंद होत आहे, असे विजय दर्डा यांनी म्हणताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले, ‘‘महाराष्टÑाच्या पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा असा सोहळा असून, राज्याची अधिक प्रगती वैभवशाली करण्यासाठी पीडितांचा आवाज बनून, चांगुलपणाला समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार सतत करीत असतो.’’
ते म्हणाले, ‘‘सरकार कसे चांगले आहे, हे सांगण्यासाठी पत्रकारिता नसते. काय कमतरता आहे हे दाखविणे पत्रकाराचा धर्म आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीशी प्रतारणा करू नये. समाजाला सत्य सांगायचे काम करावे. डिजिटल युगात मोबाइलवर बातम्या समजतात. अशी परिस्थिती असताना विश्वासार्हता जपण्याचे काम करावे. कोणाच्या दबावाखाली येऊन सत्याची कास सोडू नये.’’
राजीव खांडेकर म्हणाले, ‘‘मुद्रित माध्यमाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय वाचक आणि वाचनाची पद्धत बदलत आहे. बदलांना सामोरे जायला हवे. बदलाच्या लाटेवर स्वार झाला नाही, तर लाट गिळल्याशिवाय राहणार नाही. पत्रकारांना सत्त्व सांभाळावे लागले. ’’
राजा माने यांनी स्वागत केले. संजय भोकरे यांनी प्रास्ताविकात पत्रकार संघाची भूमिका विशद केली. अनिल रहाणे यांनी सूत्रसंचालन केले.
ऋषितुल्य बाबांचा शब्दगौरव
- संतश्रेष्ठ तुकोबारायांची पगडी, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन शिंगोटे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्टÑातून आलेल्या पत्रकारांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत मानवंदना दिली, तर दर्डा यांनी बाबांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत, त्यांनी पत्रकारितेला वेगळी दिशा व प्रेरणा दिल्याचा शब्दगौरव केला.
स्पर्धा ही निकोप हवी
- ‘लोकमत वृत्तपत्रसमूहाने पत्रकारांना नेहमी स्वातंत्र्य व सन्मान दिला आहे. पा. वा. गाडगीळ व बाबा दळवी या संपादकांच्या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. पत्रकार संघातर्फे बाबूजींच्या नावाने दोन वर्षांपासून पुरस्कार दिला जात आहे. पत्रकारितेतील बाबूजींच्या विद्यापीठातील आम्ही विद्यार्थी आहोत. अनेक विद्यार्थी आज संपादक म्हणून भूमिका बजावत आहेत. संपादकांना स्वातंत्र्य आणि सन्मान द्यायला हवा. संपादकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे संस्कार ‘लोकमत’मध्ये आहेत. सत्याची कास धरून वाचकाशी नाते जोडल्याने, निर्भीड पत्रकारितेमुळे लोकमत महाराष्ट्रात आणि पुण्यात नंबर एक झाला आहे. कोणतेही काम करताना स्पर्धक असल्याशिवाय मजा नाही. मात्र, स्पर्धा ही निकोप असायला हवी. स्पर्धकाचाही सन्मान राखायला हवा, असे विजय दर्डा यांनी सांगितले.
गौरव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भोसरीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा जीवनगौरव पुरस्कार वितरण करताना (डावीकडून) संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर.
Add new comment