कर्जमाफी देणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही, धनंजय मुंडे यांचा सरकारला टोला
नाशिक - २००८ साली पवार साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली नाही. शेवटी 'इथे पाहिजे जातीचे हे येड्यागबाळ्याचे काम नाही' अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत सरकारला टोला लगावला.
यावेळी पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, हल्लाबोल यात्रेचा हा तिसरा टप्पा चालू आहे. मला विश्वास आहे जेव्हा पाचवा टप्पा संपायला येईल तोपर्यंत राज्यातील भाजपचे सरकार उलथायला सुरुवात झालेली असेल.भाजपला मत देऊन आमच्याकडून चूक झाली, असा संदेश लिहिलेले डिजिटल फलक देशात सर्वात पहिल्यांदा सटाणा तालुक्यात लागले होते. हा तालुका जे बोलला ते आता महाराष्ट्र आणि देश बोलू लागला आहे. 2014 झालेली ही चूक आता 2019 ला दुरुस्त करायची असल्याचे आवाहन केले. मोदीजींनी निवडणुकीआधी १५ लाख प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर येतील असं सांगितलं. ते तर सोडाच पण विजय मल्ल्या, नीरव मोदी हजारो कोटी बुडवून पळालेत त्यावरून जनतेच्याच डोक्यावर प्रत्येकी १५ लाख कर्ज होते की काय, अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
Add new comment