छिंदमला कैद्यांनी तुडविले अहमदनगर कारागृहातील प्रकार; जोरदार घोषणाबाजी

 नगर, (प्रतिनिधी):- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याला आज (शनिवार) सबजेल कारागृहात शिवप्रेमी कैद्यांकडून मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. 
छिंदम याची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. छिंदम याच्याविरोधात महापुरुषाचा अवमान आणि समाजभावना दुखावल्याबद्दल तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. कारागृहाचे अधीक्षकांनी मात्र त्याला मारहाण झाली नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्याला सुरक्षेच्या कारणास्तव इतरत्र हलवत असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचे नगर शहरप्रमुख तथा नगरसेवक दिलीप सातपुते यांनी त्याबाबत फिर्याद दिली आहे. प्रभागातील कामानिमित्त आज दुपारी महापालिकेत पोचलो. तेथे गेल्यानंतर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी व्हॉट्सऍपवरून ऑडिओ मेसेज टाकला. त्यात उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याकडून बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यास दमबाजी करताना महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचे ऐकले. त्याबाबत कर्मचार्‍यांनीही कामगार संघटनेकडे तक्रार केल्याचे समजले. शिवजयंती झाल्यानंतर प्रभागातील कामे करतो, अशी विनवणी बिडवे करत आहेत; मात्र त्यानंतर छिंदम यानी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यातून महापुरुषाचा अवमान झाल्याने समाजभावना दुखावल्या आहेत. त्याबाबत रमेश खेडकर, संजय कोतकर, प्रशांत भाले, शुभम बेंद्रे, सचिन जाधव यांना सांगून पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महापुरुषांचा अवमान, धार्मिक भावना दुखविल्याबद्दल आणि धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू ठेवून अपशब्द उच्चारल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद सातपुते यांनी दिली आहे.  

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.