शासकीय कामाच्या उद्घाटनांची जाहीरात असेल तरच प्रसिध्दी
मालक-संपादकांच्या बीडमधील चिंतन बैठकीत एकमुखाने निर्णय ◼प्रशासकीय मान्यतेशिवाय निधी मंजूर झाल्याच्या बातम्या पेरणार्या हौसी नेत्यांना आता बसणार दणका
प्रतिनिधी। बीड दि. 16 ः बीड जिल्ह्यातील विविध शासकीय कामांचे उद्घाटन, राजकीय लाभाच्या हेतून काढलेले मोर्चे यांना यापुढे बीडच्या स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिध्दी देण्यात येणार नाही. अशा कामांच्या जाहीराती काढलेल्या असतील तर आणि तरच संबंधीत कामांची बातम्या स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी, असा निर्णय बीडच्या स्थानिक वर्तमानपत्राचे मालक- कार्यकारी संपादक- व्यवस्थापकांच्या चिंतन बैठकीत घेण्यात आला. येथील पत्रकार भवनामध्ये आयोजित केलेल्या बैठकीस दैनिक पार्श्वभुमीचे संपादक गंमत भंडारी, सुराज्यचे सर्वोत्तम गावरसकर, लोकप्रश्नचे दिलीप खिस्ती, प्रजापत्रचे सुनील क्षीरसागर, संजय मालाणी, संकेतचे नरेंद्र कांकरिया, चंपावतीपत्रचे सुनील क्षीरसागर, अभिमानचे राजेंद्र होळकर, झुंजार नेताचे अजित वरपे, कार्यारंभचे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे, हिंद जागृतीचे अभिमन्यू घरत, सिटीझनचे मुजीब शेख, चंदन पठाण, रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, लोकाशाचे कार्यकारी संपादक भागवत तावरे, रणझुंजारचे आगवान दादा यांची उपस्थिती होती. या बैठकीत बोगस दैनिकांचा बीडमध्ये झालेला सुळसुळाट, विविध वेब पोर्टल, यू ट्यूब चॅनल आणि जिल्ह्यातील नेत्यांचा डिजीटल होण्याकडे वाढलेला कल. सरकारच्या ‘क’ दर्जाच्या वर्तमानपत्राला बंद झालेल्या जाहीराती, आदींवर पहिल्यांदाच एकत्र आलेल्या मालक आणि संपादकांनी चर्चात्मक चिंतन करीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार जिल्ह्यात कुठल्याही शासकीय निधीतून केलेल्या कामांची उद्घाटने नेत्यांना करायची असतील जाहीराती मिळायलाच हव्यात. राजकीय लाभ उठविण्यासाठीचा मोर्चा, आंदोलन (सामाजिक हित वगळून) यांचे शहरभर डिजीटल लावत दुसर्या दिवशी वर्तमानपत्राकडून चांगल्या बातम्यांची अपेक्षा करीत असतील तर त्या मोर्चा, आंदोलनाच्या जाहीराती प्रिंटमधील दैनिकांना प्राधान्याने दिल्या जाव्यात. अन्यथा अशा बातम्यांना प्रसिध्दी दिली जाऊ नये. आमक्या योजनेसाठी इतक्या कोटींचा निधी मंजूर म्हणून स्थानिकचे लोकप्रतिनिधी माध्यमांसहीत जनतेची दिशाभूल करतात. त्यामुळे असा निधी मंजूर झाल्याच्या लेखी ऑर्डर शिवाय बातम्या प्रसिध्द केल्या जाऊ नयेत. नेत्यांनी प्रशासकीय मान्यतेआधीच असा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना प्रसिध्दीची हौस किती महाग पडू शकते, हे दाखवून देण्याचा गंभीर ईशाराच या बैठकीत मालक-संपादकांनी दिला आहे. राज्यभर नाव कमावणारे बीडमधील विविध नेते मोठे करण्यात स्थानिक माध्यमांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र आता हेच नेते (सत्ताधारी आणि विरोधक) माध्यमांना जाणीवपुर्वक अडचणीत आणू पहात आहेत. त्यामुळे मालक-संपादकांनी एकत्रित येत हा धोरणात्मक निर्णय घेतला असून त्याची तातडीने अमंलबजावणी सुरु केली आहे. *डिजीटल नेत्यांना आवर घालणार* गावभर डिजीटल बॅनर लाऊन, कुठेतरी शंभर-दोनशे रुपयांची फळे वाटप करुन वाढदिवस साजरे करण्याची अनेक युवा नेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. असे युवा नेते स्वतःच स्वतःची स्तुती करणारी पत्रके माध्यमांपर्यंत बेमालूमपणे पोहोच करतात. या डिजीटल नेत्यांनाही आता आवर घालण्याचा निर्णय मालक- संपादकांच्या बैठकीत घेण्यात आला. माध्यमांची वक्रदृष्टी या डिजीटल नेत्यांनी स्वतःवर पाडून घेऊ नये, असा ईशाराही या बैठकीत युवा नेत्यांना देण्यात आला आहे. -----------
Add new comment