लाइव न्यूज़
मुख्यमंत्री गडावर; आ.मेटेंचे वजन वाढले! ना.देवेंद्रांच्या भाषणाकडे जिल्ह्याचे लक्ष
Beed Citizen | Updated: February 15, 2018 - 3:27pm
बीड (प्रतिनिधी) श्रीक्षेत्र नारायणगडावरील २५ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडावर दाखल झाले आहेत. शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री येत असल्याने त्यांचे राजकीय ‘वजन’ अधोरेखीत झाले आहे. गडाच्या व्यासपिठावरून ना.देवेंद्र फडणवीस काय घोषणा करतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे सक्रिय झाले आहेत. नारायणगडाच्या विकासासाठी २५ कोटी रूपयांचा आराखडा राज्य शासनाने मंजूर केल्यानंतर आ.मेटे यांनी कार्यक्रमाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार दि.१० फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित झाला होता. मात्र उपराष्ट्रपतींच्या नियोजीत विदर्भ दौर्यामुळे तो कार्यक्रम निश्चित होवू शकला नाही. परिणामी काहींचे पोटसुळ उठल्याचा आरोप आ.मेटे यांनी केला होता. दरम्यान आ.विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडून शब्द घेत दि.१५ फेब्रुवारी रोजी भूमीपूजनाचा कार्यक्रम निश्चित केला. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी उशिरा नारायणगडावर दाखल झाले असून सर्वप्रथम त्यांनी समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर विश्वस्तांशी चर्चा केली. दुपारी उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. मुख्यमंत्री दौर्याच्या निमित्ताने आ.विनायक मेटे यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा जिल्हाभर होवू लागली असुन आजच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा खुद्द आ.मेटे यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज गडाच्या व्यासपिठावरून काय बोलतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Add new comment