जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईत निघाली रॅली
अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, या मागणीसाठी अंबाजोगाईतील सर्व पक्ष व संघटना बुधवारी सकाळी एकत्र आल्या होत्या. रॅलीतून जिल्हा निर्मितीच्या घोषणा देत उपजिल्हाधिका-यांना दोन हजार नागरिकांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन देण्यात आले.
अंबाजोगाई जिल्हा व्हावा, ही येथील नागरिकांची जुनीच मागणी आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सर्व पक्ष व संघटनांनी एकत्रित येऊन अंबाजोगाई जिल्हानिर्मिती कृती समितीच्या माध्यमातून बुधवारी उपजिल्हाधिकारी यांना दोन हजार नागरिकांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन दिले. १० वाजता नगर परिषद कार्यालयापासून शहरवासियांची रॅली बसस्थानक, सावरकर चौक, शिवाजीचौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
जिल्हा निर्मितीसाठी सर्व पूरक कार्यालय अंबाजोगाईत उपलब्ध आहेत. सर्व अनुकूलता उपलब्ध असल्याने तात्काळ अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा, तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड, उमाकांत दांगट यांनी जिल्हा निर्मितीचा अहवाल प्रशासनाकडे पाठविलेला आहे. या अहवालाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना भेटणार
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जिल्हा निर्मितीचे शिष्टमंडळ नारायणगड येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेणार आहे. आ. विनायक मेटे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी मध्यस्थी केली आहे. आता यासंदर्भात शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.
Add new comment