सुसंगती चांगली असेल तरच प्रगती - आ.जयदत्त क्षीरसागर
सिध्देश्वर मंदीराचे वैभव वाढवण्यात आ.क्षीरसागर यांचे योगदान - विवेकानंद शास्त्री
----------------------------------------------------------------------
बीड (प्रतिनिधी)ः- मन, माणूस आणि माणूसकी जपण्यासाठी वारकरी सांप्रदायाचे विचार अंगिकारले पाहिजेत. ईश्वर प्रप्ती करीता कुठेही जाण्याची गरज नाही. ईश्वराच्या नाम सामर्थ्यामध्येच अद्भूत शक्ती असून सुसंगती चांगली असेल तर माणसाची प्रगती होऊ शकते असे प्रतिपादन लोकनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले तर श्री क्षेत्र सिध्देश्वर संस्थान अलंकापुरीचे वैभव वाढवण्यात आ.जयदत्त क्षीरसागर यांचे योगदान असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.महंत वेदांताचार्य स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी केले.
वैकुंठवासी ह.भ.प.आबादेव महाराज यांनी सुरू केलेल्या महाशिवरात्री सोहळ्याच्या 40 व्या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता बुधवारी शिरूर येथे झाली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आबादेव महाराज यांनी सुरू केलेली ही 40 वर्षांची परंपरा असून दरवर्षी या सप्ताहाचे निमंत्रण असते. काल्याचा प्रसाद आणि किर्तनाचा लाभ घेण्यात वेगळा आनंद मिळतो. आबादेव महाराजांनी या संस्थानचे वैभव वाढवण्यासाठी परिश्रम घेतले आहेत आणि विवेकानंद शास्त्री यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन त्याची प्रगती साधली आहे. अनेक सांप्रदाय उगवतात आणि अस्तही होतात. वारकरी सांप्रदाय कलेकलेने वाढतो आहे. जेथे संतांची मांदियाळी जमते तेथे परिवर्तनाची सुरवात होत असते. सामाजिक समतेची शिकवण संतांकडूनच मिळते. संत जात पहात नाहीत, कोण कुठल्या जातीचा यापेक्षा माणूस म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. अलंकापुरची वैभव आता वाढू लागले आहे. अध्यात्मामध्ये आरक्षणाची कधी गरज पडली नाही म्हणूनच अनेक महिला संतांनी देखील या माध्यमातून समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. संसार प्रेमाचा आणि यशाचा करायचा असेल तर अध्यात्माची सांगड घालणे गरजेचे आहे. वारकरी सांप्रदायाची अवीट गोडी निर्माण करण्यासाठी संतांनी मोठे योगदान दिले आहे. मुळातच सुसंगती चांगली असेल तर माणसाची प्रगती निश्चितच होते. ईश्वर प्राप्तीसाठी कुठेही जाण्याची गरज नसते, केवळ नामस्मरणामध्येच ही अद्भूत शक्ती दडलेली आहे. विणेची वाणी व वाणीचा बाण हा शब्दरूपी वाणीचा बाण जपून वापरावा लागतो. मनाला बोचले तर पाणी डोळ्यातून येते तर शरीराला काटा बोचला तर रक्त येते. त्यामुळे माणसांची मने जपण्यात आणि माणूसकी जपण्यात आपला वेळ खर्ची करावा. मन, माणूस व माणूसकी जपण्यासाठी वारकरी सांप्रदाय अखंडपणे प्रयत्न करतो आहे. या संस्थानच्या वतीने ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत त्यासाठी आपण पाठपुरावा करून मंजूर करून घेऊ तसेच साठवण तलावाचा प्रश्नही मार्गी लावू असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना वेदांताचार्य विवेकानंद शास्त्री म्हणाले की, वक्ता आणि श्रोता हा अलंकापुरीतच एकत्र येतो. किर्तन, गायन, वादन एकरूप होऊन चालते. तन-मन-धनाने वारकरी सांप्रदाय एकत्र येतो. विशेष म्हणले या सप्ताहात सर्व जाती, धर्माचे लोक सहभागी होतात. या संस्थानचे वैभव आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून वाढले आहे. 25 लाख रूपये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून त्यांनी मंजूर केले आणि या क्षेत्राचा विकास झाला. यावेळी दिलीप गोरे, वैजीनाथ तांदळे, सुधाकर तांदळे, सभापती राणी बेद्रे, जि.प.सदस्य शिवाजी पवार, संजय सानप, आयुब तांबोळी, जिजा आघाव, सरपंच आघाव, प्रकाश इंगळे, माजी सभापती काटे, कलंदर पठाण, नागेश सानप, सुभाष क्षीरसागर, किरण सानप, मिना उगलमुगले, संतोष कंठाळे, सुलेमान पठाण, लहू ढाकणे, सुधाकर मिसाळ, शरद ढाकणे, पं.स.सदस्य सरवदे, शेख बाबा, पी.एस.आय.पाटील, अक्षय रणखांब, कांता रणखांब, प्रविण नागरगोजे, आण्णा राऊत, प्रकाश देसरडा, चंद्रकांत महाराज वारंगुळेकर आदि उपस्थित होते.
Add new comment