लाइव न्यूज़
शांतता: खून, दरोडे, लुटमार सुरू आहे! पोलिसांना आव्हान; परप्रांतीय टोळ्या सक्रिय झाल्याचा संशय
Beed Citizen | Updated: February 14, 2018 - 3:18pm
बीड (प्रतिनिधी) आष्टी परिसरात दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडत नाही तोच गेवराईतील धोंडराईत अज्ञात दरोडेखोरांनी शेतवस्त्यांवर धुमाकूळ घालत तिघांना बेदम मारहाण केली. मुंडके धडावेगळे करण्याइतपत मारेकर्यांची मजल गेली असून केजजवळ अज्ञात दरोडेखोरांनी सराफा व्यापार्याची हत्या करत दागिने लुटल्याचा प्रकार घडला. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यात कायद्याचा धाक आहे की नाही? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. दबंग कारवाया करणारे अधिकारी आणि प्रशासन कुठे गेले? असाही प्रश्न विचारला जात असून वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
बीड जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आष्टी शिवारात दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्ये तीन ते चार पोलिस जखमी झाले. त्या पाठोपाठ गेवराई तालुक्यातील धोंडराईत शेतवस्त्यांवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. त्यानंतर काही तासातच बेलगाव येथे वृध्दाची निर्घूणपणे हत्या झाली. नेकनूरजवळील लिंबागणेश परिसरातही मानवी सांगाडे सापडल्याने खळबळ उडाली. केज, अंबाजोगाई रस्त्यावर रात्रीच्या दहा वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी लुटीच्या उद्देशाने सराफा व्यापार्याच्या गाडीला धडक दिली. त्यामध्ये विकास थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोरांनी दागिन्यांची पिशवी घेवून पळ काढला. या घटनेने तर जिल्हाभरात थरार उडाला असून व्यापार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनांवरून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. पोलिसांचे पथक अवैध धंद्यांविरूध्द कारवाईचा बडगा उगारत दिवसात तीन तीन छापे टाकत आहेत. तर दुसरीकडे गुन्हेगारांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्यातील संताप व्यक्त होवू लागला आहे. केज येथील सराफा व्यापार्याला धडक देवून लुटण्याच्या घटनेत परप्रांतीय टोळीतील म्होरक्याचा समावेश असल्याचा संशय खुद्द पोलिसांनीच व्यक्त केला आहे. यावरून जिल्ह्यात आता परप्रांतीय टोळ्या सक्रिय झाल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Add new comment