आत्महत्येशिवाय भरपाई मिळणार नाही का
अहमदनगर( प्रतिनिधी) माळशेज घाटात दरड कोसळून ठार झालेल्या ट्रकचालकाचे कुटुंब उघड्यावर आले आहे. सरकारकडे दोन वर्षे पाठपुरावा करूनही मदत मिळालेली नाही. मदतीसाठी आम्हालाही आत्महत्या करावी लागेल काय, असा सवाल मृतचालकाची पत्नी परवीन उर्फ आरजू शेरअली सय्यद यांनी केला आहे.
सावर्जनिक बांधकाम तथा अपत्ती निवारण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाठविलेल्या पत्रात सय्यद यांनी आपली व्यथा मांडली आहे. जुलै २०१६ मध्ये पावसामुळे माळशेज घाटात दरड कोसळली होती. त्यावेळी तेथून जाणारा ट्रक दरडीखाली दबला जाऊन दरीत कोसळला. यामध्ये चालक शेरअली सय्यद मरण पावला. दुर्गम खोल दरीत सरकारी यंत्रणेने शोध घेऊनही त्याचा मृतदेह सापडला नाही. मात्र, मृतदेह सापडत नाही म्हणून सरकारी मदत मिळत नसल्याकडे सय्यद यांनी लक्ष वेधले आहे. त्याच दरम्यान सावित्री नदीवरील पूल कोसळून अपघात झाला होता. त्यातही अनेकांचे मृतदेह सापडले नाहीत, तरीही त्यांना मृत घोषित करून मदत देण्यात आली. अलीकडेच कोल्हापूरमध्ये पुलावरून मिनी बस कोसळून अपघात झाला, त्यातही मदत देण्यात आली. मात्र, आपल्या पतीच्या बाबतीतच सरकार नियमावर बोट ठेवून आहे. दरड कोसळल्यामुळे झालेला अपघात ही नैसर्गिक अपत्तीच आहे. घटनेच्या सर्व नोंदी सरकारी दरबारीत आहेत. तरीही आपल्याला मदत मिळत नाही, त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मदत मिळणार नसेल तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा परवीन यांनी या पत्रात दिला आहे.
Add new comment