लाइव न्यूज़
धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना ५४ लाखांचा मोबदला मिळणार
Beed Citizen | Updated: February 13, 2018 - 3:48pm
मुंबई (वृत्तसेवा) मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना ५४ लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकार्यांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे. पाटील यांच्या पाच एकर जमिनीसाठी ५४ लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. यापूर्वीचा पंचनामा रद्द करुन रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरण्यात येणार आहे. मनरेगा कायद्यातील तरतुदीप्रमाणे धर्मा पाटील यांच्या नावे २८ लाख ५ हजार ९८४ रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना २६ लाख ४२ हजार १४८ रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे. इतर १२ प्रकल्पबाधित शेतकर्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे.
मंत्रालयात विष प्राशन केलेले ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा २८ जानेवारीला मृत्यू झाला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणार्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. धुळे जिल्ह्यात होणार्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची ६०० झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ ४ लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकर्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं. धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारनं पाटील यांच्या कुटुंबियांना १५ लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.
Add new comment