लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यातील शिवालयांमध्ये ‘हर हर महादेव’ चा जयघोष
बीड (प्रतिनिधी) महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरातील शिवालयामध्ये आज हर हर महादेवचा जयघोष झाला. सकाळपासूनच सर्वच शिवमंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, पापनेश्वर तर परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरासह जिल्हाभरातील शिवमंदिरामध्ये हर हर महादेवचा जयघोष झाला. सकाळपासूनच महिला व पुरूषांनी दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगा लावल्या होत्या. कंकालेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर भक्तांच्या सुविधेसाठी मंडप लावण्यात आला होता. हजारो भाविकांनी दर्शन घेवून महादेवाची मनोभावे पुजा केली. परळी येथील प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक हजारोंच्या संख्येने दाखल झाले असून मंदिर प्रशासनाच्यावतीने भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बीड तालुक्यातील चाकरवाडी येथेही सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. जिल्हाभरातील सर्वच शिवालये भक्तांच्या गर्दीने गजबजून गेली होती.
Add new comment