लाइव न्यूज़
शिवसेना जुन्या-नव्यांची सांगड घालणार
Beed Citizen | Updated: February 13, 2018 - 3:26pm
अनिल जगताप यांच्यावर संघटक तर पिंगळेंना समन्वयकाची जबाबदारी मिळण्याचे संकेत
बीड (प्रतिनिधी) शिवसेनेने भाकरी फिरवत खांदेपालट केल्यानंतर पदाधिकार्यांची आक्रमकता स्पष्ट झालेली आहे. नवीन पदाधिकारी अंग झटकून कामाला लागले असुन जुन्या पदाधिकार्यांनाही मानाचे स्थान देण्याच्या हालाचाली पक्षपातळीवर सुरू आहेत. जुन्या-नव्यांची सांगड घालत जिल्ह्यातील शिवसेना मजबुत करण्याचा प्रयत्न सुरू असून नव्यानेच निर्माण झालेल्या जिल्हासंघटक आणि समन्वयक पदांची जबाबदारी अनुक्रमे अनिल जगताप आणि बाळासाहेब पिंगळे यांना मिळण्याचे संकेत आहेत. दरम्यान अनिल जगताप आणि बाळासाहेब पिंगळे यांना मानणारा मोठा गट पक्षात असुन दोघांचाही सन्मान झाल्यास ताकद आणखी वाढेल अशी अपेक्षा पक्षपातळीवरून व्यक्त होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बीड जिल्हा शिवसेनेत फेरबदल करत पक्षाने युवा नेतृत्व असलेल्या कुंडलिक खांडे आणि सचिन मुळूक यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. राजकारणात सक्रिय असल्यापासून शिवसैनिक म्हणून निष्ठा जपणार्या बालाघाटावरील विलास महाराज शिंदे यांच्यावर लोकसभा संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेल्या परंतू काही काळ पक्षापासून दुरावलेल्या आणि पुन्हा हाती शिवबंधन बांधणार्या माजी आ.सुनिल धांडे यांच्यासह ऍड.चंद्रकांत नवले यांच्यावर सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी टाकण्यात आली. नवीन पदाधिकारी बांधणीमुळे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप काहीसे नाराज झाले होते. तर बाळासाहेब पिंगळे यांनी ‘मातोश्री’चा आदेश अंतीम मानत शिवसैनिक म्हणून कार्य सुरूच ठेवले. त्यानंतर काही दिवसातच माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे देखील नव्या जोमाने सक्रिय झाले. पक्षानेही जगताप आणि पिंगळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानाची पदे देण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. आगामी निवडणूकांच्या दृष्टीने दोघांवरही महत्वाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता असून नव्याने निर्माण झालेले जिल्हा संघटक आणि जिल्हा समन्वयक या दोन्ही पदावर जगताप, पिंगळे यांची वर्णी लागणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. एकूणच शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून जुन्या नव्यांची सांगड घालून आगामी निवडणूका मोठ्या ताकदीने लढण्याची तयारी पक्षाने सुरू केले असल्याची यावरून स्पष्ट होत आहे.
Add new comment