महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
परळी वैद्यनाथ
बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक सोमवारीच परळीत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. दर्शनासाठी देवस्थानकडून प्रतिवर्षीप्रमाणेच शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त आहे. सुरक्षेसाठी ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले गेले आहेत. वैद्यनाथ देवस्थान कमिटीच्या १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची परिसरात करडी नजर आहे. महिला भाविकांसाठी वेगळी तर पुरुष भाविकांसाठी वेगळी रांग लावण्यात आलेली आहे. पासधारकांची वेगळी रांग असून या पाससाठी १०० रू शुल्क आकारले गेले आहे. वैद्यनाथ देवस्थान कमिटीकडूनही मंदिरात स्वयंसेवक कार्यरत आहेत.
सोमवार रात्री १२ वाजल्यापासूनच मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले गेले. भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावलेल्या होत्या. वैद्यनाथ भगवान की जय, हर हर महादेव, शंकर भगवान की जयच्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वात अंदाजे ३ ते ५ लाख भाविक प्रभू वैद्यनाथ मंदिरात दाखल होतील अशी माहिती श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली आहे. आज मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान वैद्यनाथ देवस्थान कमिटीतर्फे जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून प्रभू वैद्यनाथास रूद्राभिषेक करून शासकीय पूजा संपन्न येईल. या अभिषेकानंतर भाविकांना अभिषेक करता येतील अशी माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.
Add new comment