आश्वासनांच्या पूर्ततेकरिता करणार प्रामाणिक प्रयत्न:- एस.के.सर
चकलांबा दि.12(प्रतिनिधी)ः- ग्राम पंचायतच्या थेट सरपंच पदाच्या निवडणूकांमध्ये निसटता पराभव झालेल्या एस.के.सरांनी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये दिलेल्या अभिवचनानुसार चकलांबा गावामध्ये वर्षानुवर्षे असलेल्या समस्या कायद्याच्या कक्षेत सोडविण्याकरिता पाऊल उचलले आहे.
सरांशी झालेल्या चर्चेतून चकलांबा गावचे कळलेले भयाण वास्तव असे की चकलांबा गावाजवळ चिमणदरा वस्ती, बाभळदरा तांडा, नागरे वस्ती, लष्करे वस्ती, धनगर वस्ती, डाग वस्ती, भांब वस्ती, नागमळा वस्ती, शेळके वस्ती, निंबाळकर वस्ती, बिचकुळ वस्ती, खेडकर वस्ती या वस्त्या आहेत. मागील तीस पस्तीस वर्षापासून या वस्त्या असलेल्या असून आजतागायात या वस्त्यांवर सिंगल फेज लाईट पोहोचलेली नाही. या वस्त्यांवरील सर्व रहिवाशी हे भटक्या विमुक्त जाती तसेच ओ.बी.सी. प्रवर्गातील आहेत.
विशेष हे की या वस्त्यांवरील जवळपास चारशे ते साडेचारशे विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या सायंकाळ ते सुर्योदयापर्यतच्या अभ्यास राम भरोसे आहे. या समस्येची उकल करण्याकरिता एस.के.सरांनी या संदर्भात जिल्हा विद्युत वितरण कंपनीकडे रितसर कार्यालयीन प्रक्रीया सुरू केलेली असून या कंपनीतील प्रशासनाकडून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक तसेच नागरीकांच्या हितासाठी सरांना सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
Add new comment