भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या अखंड हरिनाम सप्ताहाची विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता
बीड(प्रतिनिधी): येथील श्रीसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाची सांगता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 5 फेबु्रवारी रोजी झाली. ह.भ.प.रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास मा.मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आ.जयदत्त क्षीरसागर आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले, ‘मराठवाडा ही संतांची भुमी असुन संतांच्या कार्यामुळे समाज सुधारणेला गती मिळाली. बीड जिल्ह्यात संत भगवानबाबा, संत वामनभाऊ महाराज, वै.ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या कार्यामुळे अध्यात्मिक प्रगतीबरोबरच सामाजिक प्रगती झाली. संतांचे कार्य अतुलनीय व अवर्णनीय आहे. संतांच्या कार्यांचा वसा आणि वारसा घेवून सर्वांनी कार्य करण्याची गरज त्यांनी यावेळी केली. संत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठाणच्या कार्यांची प्रशंसा करुन त्यांनी यावेळी 15 लाख रुपयांचा त्यांनी विकास कामांसाठी जाहिर केला. यावेळी बीड बाजार समितीचे सभापती दिनकरराव कदम, बीड तालुका दुध संघाचे अध्यक्ष विलासराव बडगे, अरुण नाना डाके आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.लहाने यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सर्व संत, महंत, प्रमुख अतिथी यांच्यासह सप्ताहास देणगी देणार्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ.लहाने, प्रा.आर.टी.गर्जे, टी.डी.तांदळे, आसराजी नागरगोजे, के.डी.तांदळे, अशोक सानप आदींच्या वतीने करण्यात आले. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
या सप्ताहाचा प्रारंभ बीड जिल्ह्याच्या खा.प्रितमताई मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविताताई गोल्हार, नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांच्यासह संत, महंत भाविकांच्या उपस्थिती झाला. या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प.अशोक महाराज इलभ, ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.आक्रुर महाराज साखरे, महामंडलेश्वर अमृत महाराज जोशी, कीर्तनरत्न ह.भ.प.अर्जुन महाराज खाडे, विनोदाचार्य ह.भ.प.प्रकाश महाराज साठे, भागवताचार्य ह.भ.प.विवेकानंद शास्त्री सिध्देश्वर संस्थान शिरुर यांची कीर्तन सेवा झाली. या सप्ताहाच्या दरम्यान रविवार दि.4 फेबु्रवारी 2018 रोजी वधु-वर परिचय व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वधु-वर परिचय मेळाव्यासाठी संयोजक डॉ.संजय तांदळे यांनी विशेष प्रयत्न केले.
Add new comment