लाइव न्यूज़
वसंतराव नाईक महामंडळाला सहा महिन्यांपासून व्यवस्थापकच नाही.
मी वडार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खुर्चीला घातले हार
बीड (प्रतिनिधी) येथील वसंतराव नाईक भटके व विमुक्त महामंडळाच्या कार्यालयाला सहा महिन्यांपासून जिल्हा व्यवस्थापकच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या समाजातील नागरीकांची अनेक कामे खोळंबल्याने ‘मी वडार’ संघटनेच्यावतीने आज सकाळी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा व्यवस्थापकांच्या खुर्चीला हार घालत निषेध नोंदविला. याठिकाणी जिल्हा व्यवस्थापकाची नियुक्ती न झाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बीड शहरात वसंतराव नाईक भटके व विमुक्त महामंडळाचे कार्यालय आहे. त्या कार्यालयाअंतगत या समाजातील लोकांना विविध योजनांचा लाभ मिळावा हा उद्देश असला तरी गेल्या सहा महिन्यांपासून या कार्यालयाला जिल्हा व्यवस्थापक नसल्याने भटके विमुक्त समाजातील लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याप्रश्नी ‘मी वडार’ संघटनेने वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ यांच्या सुचनेवरून तालुका प्रमुख दत्ता जाधव, महादेव जाधव, संतोष जाधव, विलास धनवटे, अशोक धनवटे, अरूण देवकर, रमेश पवार व इतरांनी आज सकाळी महामंडळाच्या कार्यालयात गांधीगिरी आंदोलन केले. जिल्हा व्यवस्थापकाच्या खुर्चीला हार घालत लवकरच हा प्रश्न मार्गी न लागल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
Add new comment