लाइव न्यूज़
हंगामी वस्तीगृह चालकांची बोगसगिरी बायोमेट्रीक मशिन बंद तर विद्यार्थीही बोगस!
शेख तालीब|बीड
——————————————————
बीड (प्रतिनिधी) सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या हंगामी वस्तीगृहातील बोगसगिरी चव्हाट्यावर आली असून जिल्ह्यात जे ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी वस्तीगृह सुरू करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. परंतू याचा बारकाईने अभ्यास जर केला असता कुठे पत्र्याचे शेड तर काही ठिकाणी विद्यार्थीच नाहीत. तर काही ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा नसल्याचे आढळून येते. यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय अनुदानात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेला दिसून येतो. जिल्हा परिषद शिक्षण विभाग मार्फत राबविल्या जाणार्या योजनाचे उद्दिष्ट शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे व टिकविणे हे असून या योजनाचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून शैक्षणिक विकास साधण्याचा आहे. परंतू जिल्ह्यात हंगामी वस्तीगृह चालकांची बोगसगिरीमुळे या योजनेला गालबोट लागले आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील लाखो ऊसतोड कामगार महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्रा या राज्यांमध्ये उसतोडणीला जातात. हे गेल्यानंतर घरी लहान मुलेच राहतात. त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी शासनाने घेवून ऊसतोड मजुरांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी हंगामी वस्तीगृह सुरू करण्यात आले. बीड जिल्ह्यात सरकारी आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात हे वस्तीगृह सुरू करण्यात आले असून या वस्तीगृहांची जिल्ह्यात जवळपास ५८७ एवढी संख्या असून यामध्ये जवळपास ३३ हजार विद्यार्थी संख्या आहे. वस्तीगृह संस्थाचालकांना एक विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्याकरीता आठ हजार पाचशे रूपये अनुदान असुन ह्यासाठी शासनाकडून ३६ कोटी रूपये एवढा निधी बीड जिल्ह्यासाठी मंजूर झालेला असून त्यापैकी ३६ लाख रूपये जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात आलेला आहे. परंतू या सर्व प्रक्रियेत फार मोठी बोगसगिरी समोर येत असून हंगामी वस्तीगृह चालकांना शासनाने बायोमेट्रीक पध्दतीने विद्यार्थी उपस्थितीसाठी अंगठा सक्तीचे केल्याने वस्तीगृहचालकासमोर पेच निर्माण झाला होता. परंतू संस्थाचालकांनी नवीन शक्कल लढवत बायोमेट्रीक बंद किंवा खराब झाले असल्याचे सांगत विद्यार्थी संख्या जुन्या पध्दतीनुसार हजरीपटावर दाखविल्याचे प्रयत्न केले जात आहे. बीड जिल्ह्यात हंगामी वस्तीगृह संख्या ५८७ असून महाराष्ट्र शासनाच्यावतीने ज्या वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाते. परंतू अनेक वस्तीगृहात विद्यार्थी नसल्याची माहिती पुढे आल्याने या बोगसगिरीला चाप बसविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने जिल्हा परिषद स्थानिक पातळीवर वस्तीगृहातील विद्यार्थी संख्या दाखविलेल्या संख्यानुसारच आहे. याकरीता प्रत्येक हंगामीवस्तीगृहाला बायोमेट्रीक पध्दतीने हजरी घेण्याची सक्ती करण्यात आली होती. परंतू काही वस्तीगृहाची विद्यार्थी संख्या बोगस दाखविण्याचे प्रकरण चव्हाट्यावर येवू नये यासाठी बायोमेट्रीक मशिन खराब असल्याचे दाखवत हजरी पटावर विद्यार्थीसंख्या दाखविण्यात येत आहे. यामागे मोठा भ्रष्टाचार असुन याची सखोल चौकशी करण्याची मागणी नुतन जिल्हा कार्यकारी अधिकारी अमोल एडगे यांनी करावी.
Add new comment