लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यात गारपिट; पिकांना तडाखा
बीड (प्रतिनिधी) दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज पहाटे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली. बीड, माजलगाव, गेवराई, शिरूर तालुक्यासह अन्य ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे पिकांना मोठा तडाखा बसला आहे. माजलगाव तालुक्यातील पपईच्या बागा पुर्णपणे उध्वस्त झाल्या असून रब्बीच्या अन्य पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे रब्बीतील पिके धोक्यात आलेली असतानाच आज पहाटे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली. बीड तालुक्यातील पिंपळनेर, पौळाचीवाडी माजलगाव तालुक्यातील काळेगाव, हिवरा, डुबाथडी येथे ठिक सकाळी ७ वाजता जोरदार गारांचा पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी गारांचा थर साचल्याने चित्र पाहायला मिळाले. गेवराई, शिरूर सह अन्य तालुक्यातही गारपीट झाली आहे. माजलगाव तालुक्याला गारपीटीचा सर्वाधिक फटका बसला असुन मंगळूर येथील शेतकरी रविंद्र राजाभाऊ बापमारे यांच्या एक एक्कर शेतातील पपईची फळबाग उध्वस्त होवून लाखोंचे नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे झाडाला लगडलेल्या पपया गळून पडल्या आहेत.
Add new comment