लाइव न्यूज़
आ.क्षीरसागर,धस.मुंदडा यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या हालचालींनी वेग
बीड (प्रतिनिधी) गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील जाहीर कार्यक्रमांपासून दुर असलेले मातब्बर नेते आ.जयदत्त क्षीरसागर आणि केज मतदार संघातील मास लिडर नंदकिशोर मुंदडा यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीतून बाहेर पडत जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपला साथ देणारे माजी मंत्री सुरेश धस हे देखील त्यांच्यासमवेत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. डीएमके (धस, मुंदडा, क्षीरसागर) हे लवकरच कॉंग्रेसमध्ये दिसतील अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान मातब्बर नेत्यांचा कॉंग्रेस प्रवेश झाल्यास जिल्ह्यातील समिकरणे बदलण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दोन दिवसापूर्वीच सायं.दै.सिटीझनने ‘बीडच्या जागेवर कॉंग्रेसचा दावा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे दिलेले संकेत प्रत्यक्षात दिसू लागल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
बीड येथील ज्येष्ठ नेते आ.जयदत्त क्षीरसागर गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील पक्षीय कार्यक्रमांपासून आलिप्त होते. स्थानिक नेतृत्वाकडूनच डावलण्यात येत असल्याने आ.क्षीरसागर समर्थकही अस्वस्थ होते. राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांच्या जिल्हा दौर्याच्या वेळीही आ.क्षीरसागर यांना साधे निमंत्रणही पाठवण्याचे धाडस स्थानिक पदाधिकार्यांनी दाखवले नाही. पक्षानेही त्याची दखल न घेतल्याने समर्थकांमध्ये कमालीचा संताप होता. त्यातूनच आ.क्षीरसागर यांनी बीड दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चहापानासाठी स्वत:च्या निवासस्थानी आमंत्रीत केल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती. तेव्हापासूनच राजकीय हालाचाली वाढल्या आणि आ.क्षीरसागर कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. त्यांच्यासमवेत केज मतदार संघातील मासलिडर म्हणून ओळखले जाणारे नंदकिशोर मुंदडा हे देखील कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी जाहीरपणे भाजपला साथ दिल्याने संख्याबळ असूनही राष्ट्रवादीला सत्तास्थापन करता आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने सुरेश धसांना पक्षातून निलंबीत केलेले आहे. धस यांनी भाजपला साथ दिली असली तरी त्यांनी अद्यापपर्यंत भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मध्यंतरी आ.जयदत्त क्षीरसाागर यांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये बंद दाराआड झालेली चर्चा वेगळ्या समिकरणांचे संकेत देणारी ठरली. आ.जयदत्त क्षीरसागर, नंदकिशोर मुंदडा आणि माजी मंत्री सुरेश धस हे तिन्ही मातब्बर नेते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या हालचालींनी वेग घेतल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. याच मुद्यांवर दोन दिवसांपासून मुंबईत मातब्बर नेत्यांचा खल सुरू असुन त्यांचा कॉंग्रेस नेत्यांसोबत संपर्कही वाढल्याचे समजते. बीडमध्ये दि.१६ फेब्रुवारी रोजी कॉंग्रेसचे कार्यकर्ता शिबीर होत आहे. त्याअनुषंगाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण एक दिवस आधीच बीड मुक्कामी येत असुन या दौर्यामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. दरम्यान आ.क्षीरसागर, सुरेश धस आणि नंदकिशोर मुंदडा यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या हालचालीने जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार हे मात्र निश्चित.
Add new comment