भाषण, चर्चा नको पाकिस्तानशी युद्ध करा - प्रवीण तोगडिया
औरंगाबाद (प्रतिनिधी): देशात एकीकडे कर्जाने शेतकरी मरत आहेत. दुसरीकडे सीमेवर पाकिस्तान व दहशतवाद्यांच्या गोळीबारात सैनिक शहीद होत आहेत. कधीपर्यंत सैनिकांना शहीद होऊ द्यायचे. चर्चा खूप झाली, भाषणही नको आता थेट पाकिस्तानशी युद्ध करा. मिसाईल, टँकचा वापर करुन हल्ला करा , असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी येथे केले.
शहरात एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर तोगडिया पत्रकारांशी बोलत होते. आज पहाटे काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात ज्युनिअर कमिशनर दर्जाच्या अधिकार्यांसह दोन जवान शहीद झाले. यावर प्रविण तोगडिया म्हणाले की, बहुत हो गया पठाणकोट, उरी अब युद्ध करो, याशिवाय कोणतेच उत्तर नाही. दहशतवादी हल्ल्यात सैनिकांचे रक्ताने माखलेले शरीर आपण फोटोत पाहिले असेल मी ही ते नेटवर पाहिले. ते सैनिक आमचे भाऊ, मुल आहेत. कधीपर्यंत असे सैनिक शहीद होत राहणार.
९० टक्के भारतीय सैनिक हे शेतकर्यांची मुले आहेत. इथे गावात शेतकर्याचा एक मुलगा कर्जाने मारत आहे तर सीमेवर पाकिस्तानच्या व आतंकवादीच्या गोळीने शहीद होत आहे. यामुळे आता भाषण नाही तर गोळ्या चालवा, मिसाईल, टँकचा वापर करुन पाकिस्तानवर हल्ला करा असेही त्यांनी नमूद केले.
Add new comment