लाइव न्यूज़
परिक्षेदरम्यान गैरप्रकार करता यावेत याच उद्देशाने सिसीटीव्ही कॅमेर्याची तोडफोड
बीड (प्रतिनिधी) शहरातील मिल्लीया उच्च माध्यमिक विद्यालयात वर्गात आणि व्हरांड्यात बसवलेले सिसीटीव्ही कॅमेरे अज्ञातांनी फोडल्याचा प्रकार काल सायंकाळी घडला. याप्रकरणी विद्यालय प्रशासनाने बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सिसीटीव्ही फोडणारा एक जण अन्य एका फुटेजमध्ये दिसून आल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान दि.२१ फेब्रुवारी पासून बारावीच्या परिक्षा सुरू होत आहेत. या विद्यालयातील परिक्षा केंद्र असल्याने त्याच पार्श्वभूमीवर गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने सिसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बीड शहरातील मिल्लीया कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाविद्यालयात काही अप्रिय घटना घडू नयेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या नियमाचे पालन करावे या उद्देशाने सर्व ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. दि.९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.५ ते ७.८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन सिसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत. तोंडाला रूमाल बांधून आलेल्या अज्ञात व्यक्तींपैकी एकाचे फुटेज अन्य एका कॅमेर्यामध्ये कैद झाले आहेत. वर्ग, व्हारांडा आणि मैदानातील कॅमेरा नं१, ९ आणि १६ या सिसीटीव्हीची तोडफोड करण्यात आली असून संबंधीत अज्ञात व्यक्तीचा शोध घेवून त्यास अटक करावी असे म्हटले आहे. दरम्यान मिल्लीया महाविद्यालयात दि.२१ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या बारावीच्या परिक्षेचे केंद्र आहे. परिक्षेदरम्यान गैरप्रकार करता यावेत याच उद्देशाने सिसीटीव्ही कॅमेर्याची तोडफोड करून व्यत्यत निर्माण करण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
बलभिम कॉलेजजवळील चौकी नावालाच?
बीड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बलभिम कॉलेजजवळ पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. दोन मोठे महाविद्यालय, अन्य शाळा याच भागात असून अनेकदा वादाचे किंवा छेडछाडीचे प्रकार घडतात. त्याअनुषंगाने संबंधीतांवर वचक रहावा म्हणून सुरू करण्यात आलेली पोलिस चौकी सध्या नावालाच आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयात येणार्या जाणार्या मुलींना अनेकवेळा त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुलींना सोडण्यासाठी पालकांना सोबत यावे लागते. त्याचबरोबर अशा काही घटनाही घडत आहेत. त्यामुळे येथील पोलिस चौकी तात्काळ सुरू करावी आणि त्याठिकाणी कायम स्वरूपी कर्मचारी नियुक्त करावा अशी मागणी या भागातील नागरीकांकडून होत आहे.
-------
Add new comment