लाइव न्यूज़
पोलिसांचे सात ठिकाणी छापे; तीन हजार लिटर गावठी दारू जप्त
बीड (प्रतिनिधी) पोलिसांनी हातभट्टी दारू विक्रेत्यांविरूध्द कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाच दिवसात जिल्ह्यात विविध सात ठिकाणी छापे टाकून तब्बल ३ हजार १६९ लिटर दारूसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत मौजे देवळा येथे गावठी दारू तयार करणार्या अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. तेथून पाच लिटर दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन शिवाजी ज्ञानोबा पवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातीलच कुरणवाडी तांडा शिवारातील वाना नदीच्या पात्रात हातभट्टी तयार करत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी १८०० लिटर दारूसह अन्य असे ४१ हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चंदु तुकड्या साखरवाले, ईबु कासम गवळी, इस्माईल चांद गवळी उर्फ चौधरी, चंदू गवळी उर्फ चौधरी यांच्याविरूध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच भागात आणखी एक अड्डा उध्वस्त करत पोलिसांनी २८ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून राजु गंगा चौधरी, सुभान चंदु गवळी, लल्लू कासम गवळी या तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. परळी शहरातील सिध्दार्थ नगर भागात पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू विकणार्या अनिल सोपान कांबळे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तेथून २२५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुसर्या कारवाईत १९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करत शेख युसूफ मोहम्मद याच्याविरूध्द संभाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर नेकनूर हद्दीतील जेबा पिंप्री येथे छापा टाकून अनिल परमेश्वर शिंदे व गेवराई तालुक्यातील खांडवी येथे छापा टाकून संतोष राघुजी भोले याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात सात ठिकाणी केलेल्या कारवाईत ७५ हजार ७१२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Add new comment