महिलांच्या बदनामीवर महिला आयोगाचा अंकुश
औरंगाबाद - सार्वजनिक ठिकाणी महिलांवर बेजबाबदार वक्तव्य करणे आता चांगलेच महाग पडणार आहे. सामाजिक माध्यमातून महिलांची बदनामीचे सर्व प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोग लवकरच कडक व धोरणात्मक सूचनांचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सोमवारी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी या विषयावर चर्चा केली. सोशल मीडियातून महिलांना त्रास देण्याचे, मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारची अवमानकारक वक्तव्ये आणि टिप्पणी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. महिलांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या अवमानकारक, मानहानीकारक आणि अश्लील वक्तव्ये अथवा टिप्पणी करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग राज्य सरकारला उपयुक्त व धोरणात्मक सूचनांचा समावेश असणारा अहवाल सादर करणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. याविषयी 'मटा'शी बोलताना रहाटकर म्हणाल्या, 'घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा छळ यासोबतच महिलांचा अपमान होईल अशाप्रकारे बोलणे, टोमणे मारणे अशा तक्रारींचे प्रमाण तितकेच जास्त आहे. अगदी राजकीय पक्षांमध्येही महिला प्रतिनिधींना त्रासातून जावे लागते. तसेच सभा, भाषणांमध्ये महिलांवर अवमानकारक वक्तव्ये करण्याचे प्रकार सातत्याने होतात. सातत्याने मिळणाऱ्या तक्रारींचे प्रमाण व विषयाचे गांभीर्य लक्षात घेता महिला आयोगाने याविषयी अभ्यास सुरू केला व तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीकडून यासंदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सूपूर्द केला जाईल,' असे रहाटकर यांनी सांगितले. आयोगाच्या अहवालाचा राज्य सरकारचा गांभीर्याने विचार करेल आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ना.पंकजा मुंडे यांनी दिले.
------------------------------------------------
नोकरदार, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि अगदी महिला लोकप्रतिनिधींकडूनही आयोगाला सातत्याने तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना आळा घालणे नितांत गरजेचे होते. सामाजिक संतुलनासाठी कोणताच पक्षीय भेद न करता महिलांचा अवमान आयोग सहन करणार नाही.
- विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
Add new comment