लाइव न्यूज़
राज्यातील ग्रामीण भागात शिक्षण व रोजगार हि अत्यंत गंभीर समस्या

बीड (प्रतिनिधी) डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) व स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने राज्यव्यापी ’युवा-विद्यार्थी जागर जत्था’चे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या ४ फेब्रुवारीपासून हे जत्थे राज्यभर युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करत आहे. नांदेड येथून सुरु झालेला मराठवाडा जत्था हा नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व औरंगाबाद या जिल्ह्यात फिरून गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात फिरत आहे. आज सकाळी या जत्थ्याचे आगमन शहरात झाले. शहरातील बलभीम महाविद्यालयासमोर या जथ्याचे स्वागत व संदेश कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ’डीवायएफआय’ राज्याध्यक्ष सुनील धानवा, ’एसएफआय’ राज्याध्यक्ष मोहन जाधव, ’डीवायएफआय’ राज्य सहसचिव जनार्धन काळे, ’एसएफआय’ जिल्हा सचिव रूपेश चव्हाण, दत्ता सोळंके, सोलापूर प्रजा नाट्य मंडळाचे शाहिर अनिल वासम, विशाल पवार, चंद्रकांत मंजुळकर, चंद्रकांत लिंबोळे आदी जत्थ्यातील नेतृत्व उपस्थित होते.
यावेळी आयोजित जत्था संदेश कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ’डीवायएफआय’ राज्याध्यक्ष सुनील धानवा यांनी सांगितले की, ‘राज्यातील ग्रामीण क्षेत्रात शिक्षण व रोजगार हि अत्यंत गंभीर समस्या असून शासन त्या पुरविण्याचे केवळ पोकळ आश्वासन देत आहे. आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी नुकतेच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्चामध्ये कपात करण्यात आली आहे. रोजगाराच्या कंत्राटीकरणावरच भर दिला जात आहे. या बजेटने तर युवक आणि तरुणांची खोर निराशा तर केलीच शिवाय त्यांची या सरकारने खिल्ली उडवली आहे. त्यामुळे हा जत्था लोकांमध्ये चेतना निर्माण करीत आहे. मराठवाड्यातील शेतकरी वर्गात तरुणांची संख्या मोठी आहे. हे तरुण शेतकरी नव्याने शेती या धंद्याकडे वळालेले आहेत. त्यांची शेती तोट्यामध्ये आहे. म्हणून त्यांची देखील निराशा होत आहे. सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून बाहेर फेकला जात आहे. गेल्या पाच दिवसापासून हे जत्थे राज्यात फिरत असून त्या - त्या भागातील गंभीर पण वास्तव परिस्थिती व त्याला जबाबदार असलेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल युवक व विद्यार्थी वर्गात मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती घडवीत आहे. २३ मार्च रोजी मुंबई येथे विद्यार्थी युवकांचा सर्व प्रश्नांसाठी मंत्रालयावर वमोर्चा काढण्यात येणार आहे.’ असेही धानवा म्हणाले.
Add new comment