लाइव न्यूज़
सीओ डॉ.जावळीकर, डिवायएसपी खिरडकर आणि पोनि.सुलेमान यांच्या धडाकेबाज कारवाईचे नागरीकांतून अभिनंदन
बीड (प्रतिनिधी) शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे अतिक्रमणे करण्यात आली होती. रस्त्याच्या कडेस असलेल्या दुकानांमुळे रहदारीस अडथळा येत होता. अख्खे रस्तेच्या रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. यासंदर्भात नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केली. काही व्यक्तींनी त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या अधिकार्यांना आणि कर्मचार्यांनाही रोखले. तेव्हा जावळीकरांनी पोलिस प्रशासनाला पाचारण केले. डिवायएसपी सुधीर खिरडकर आणि शहर ठाण्याचे पोनि सय्यद सुलेमान यांनी तातडीने अतिक्रमण स्थळी दाखल होवून पोलिस बंदोबस्तात कारवाईला गती दिली. या सर्व प्रक्रियेमध्ये पालिका आणि पोलिस प्रशासनाने सांमजस्य घडवून आणल्याने शहर आता मोकळा श्वास घेवून लागले आहे. ही कारवाई अशीच पुढे सुरू रहावी आणि रस्ते हे लोकांच्या रहदारीसाठीच असतात हे दाखवून द्यावे अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त होत आहे.
बीड शहरातील बसस्थानक परिसर, नगर रोड, बशीरगंज, राजुरीवेस, स्टेडीयम रोड या भागामध्ये पालिका प्रशासनाने आज अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर राबवलेल्या अतिक्रमण हटावच्या कारवाईला आज गती मिळाली. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी अधिकारी, कर्मचार्यांसह रस्त्यावर उतरून अतिक्रमण काढण्याची विनंती केली. काही व्यक्तींनी अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला असता डॉ.जावळीकरांनी पोलिस प्रशासनाला पाचारण केले. डिवायएसपी सुधीर खिरडकर, शहर ठाण्याचे पोनि सय्यद सुलेमान यांनी ताफ्यासह अतिक्रमणस्थळी धाव घेवून पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरूवात केली. ज्यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला त्यांच्यामध्ये सांमजस्य घडवून आणत रस्ते हे लोकांच्या रहदारीसाठी असतात ही बाब त्यांच्या निदर्शनास आणुन दिली. पालिका प्रशासन आणि पोलिसांनी घडवून आणलेल्या सांमजस्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिम सुरळीतपणे पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या रस्त्यांनी प्रथमच मोकळा श्वास घेतला. अनेक छोट्या मोठ्या इमारतीचा काही भाग अतिक्रमीत असेल तर त्याठिकाणीही जेसीबीने कारवाई करण्यात आली. हॉटेल्स, टपरी आणि दुकानांसह अन्य ठिकाणच्या अतिक्रमीत जागांवरही पालिका प्रशासनाने कारवाई केली. बशीरगंज भागातील मंदिर सभागृहाची भिंतही अतिक्रमीत जागेत होती. ती देखील पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आली. सदरील कारवाईत तिडके, सचिन जगताप, कनिष्ठ रचनकार सय्यद लईक, जोगदंड आर.एस.जाधव बी.पी.,काळकुटे आदींनी परिश्रम घेतले. मुख्याधिकारी डॉ.जावळीकर, डिवायएसपी सुधीर खिरडकर, पोनि सय्यद सुलेमान यांनी स्वत: रस्त्यावर उतरून कसल्याही प्रकारचे गालबोट न लागु देता अतिक्रमण हटवण्याची कारवाई राबवल्याने त्यांचे नागरीकांमधून अभिनंदन होत आहे.
अतिक्रमण काढतांना व्यावसायीकांचे नुकसान
बीड शहरातील बशीरगंजसह अन्य भागात अतिक्रमण काढतांना अनेक व्यावसाईकांचे नुकसान झाले आहे. दुकानाच्या समोरील अतिक्रमीत भाग पाडतांना अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे. पत्रे हटवतांनाही नुकसान झाले असून पालिकेच्या कर्मचार्यांनी अतिक्रमण काढतांना व्यावसायीकांचे नुकसान होवू नये याची काळजी घेण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.
Add new comment