ना. पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे पंधरा दिवसांत बैठक घेऊ - उर्जामंत्र्यांचे उपोषणकर्त्यांना आश्वासन
परळी - राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर वीज महानिर्मिती प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीने रात्री उशीरा आपले उपोषण व आत्मदहन मागे घेतले. दरम्यान ना. पंकजाताई मुंडे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व उपोषणकर्ते यांच्यात थेट संवाद घडवून आणल्याने प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला.
तीन वर्षं प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांना महावितरणच्या नियमाप्रमाणे तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, ज्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे एक वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, त्यांना वीस हजार रुपये मानधन देऊन वीज निर्मितीचे सर्व नियम लागू करावे, तंत्रज्ञ - 3 पदाची भरती करावी या व इतर मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी सोमवार पासून औष्णिक वीज केंद्रासमोर उपोषण सुरू केले होते, याशिवाय त्यांनी आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता.
पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची तातडीने दखल घेत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली तसेच काॅन्फरन्स काॅलद्वारे उपोषणकर्त्यांशी त्यांचा थेट संवाद घडवून आणला. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढू असे उर्जामंत्र्यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना दिले. ना. पंकजाताई मुंडे व बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कृती समितीने रात्री आपले उपोषण व आत्मदहन मागे घेतले. ना. पंकजाताई मुंडे यांनी उपोषणाची तातडीने दखल घेत यशस्वी मध्यस्थी केल्याबद्दल कृती समितीचे अध्यक्ष अमोल गिराम, उपाध्यक्ष अमोल बीडगर, सचिव महादेव दहिफळे व पदाधिका-यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Add new comment