लाइव न्यूज़
क्लासेस,मेसवाले जोमात तर एमपीएसीचे विद्यार्थीे कोमात! सुशिक्षीत बेरोजगारांच्या घोषणा; मोर्चाने दणाणले शहर
बीड, (प्रतिनिधी):- सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसू लागल्याचा आरोप करत क्लासेस, मेस, अभ्यासिकावाले जोमात तर एमपीएसीचे विद्यार्थी कोमात अशा घोषणा देत हजारो सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. सिध्दीविनायक संकुलापासून सुरू झालेल्या मोर्चाने शहर दणाणून गेले.
बीड शहरात आज सकाळी सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. सिध्दीविनायक संकुल येथे सकाळपासूनच शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी दाखल झाले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरूवात झाली. स्टेडियम रोड, जालना रोड, साठे चौक, शिवाजी चौक, नगररोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचलेल्या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलिस भरतीच्या जागेत वाढ करण्यात यावी, तलाठी पदाची भरती तात्काळ करावी. १ लाख ७० हजार रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी.तसेच केंद्र सरकारच्या ४ लाख २० हजार जागा रद्द न करता त्यादेखील त्वरित भरण्यात याव्यात,राज्यसेवेच्या पदांमध्ये वाढ करण्यात यावी,प्रत्येक पदाकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात यावी,स्पर्धा परीक्षेमध्ये चाललेल्या डमी सारख्या गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपवावा,बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी,आयोगाकडून जे प्रश्न चुकतात किंवा रद्द होतात त्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण आयोगाने द्यावे,परीक्षा केंद्रावरती मोबाईल जामर सारखी यंत्रणा बसवावी, स्पर्धा परीक्षांमधील भरती घोटाळा उघडकीस आणणारे श्री योगेश जाधव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी,परीक्षा केंद्रामधील बैठक व्यवस्था हि सुसज्ज असावी,परीक्षेसाठीची प्रवेश फी हि माफक असावी जेणेकरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही, खाजगी तत्वावर तात्पुरती पदे भरण्याची पद्धत रद्द करून कायमस्वरूपी पदे भरण्यात यावी,संयुक्त परीक्षा पद्धत रद्द करून पुर्वी प्रमाणे स्वतंत्र परीक्षा पद्धत राबवावी,मुख्य परीक्षेसाठीचे केंद्र हे सांगली याठिकाणी ठेवावे, भरती प्रक्रियेशी संबंधित न्यायालयीन खटले त्वरित निकालात काढावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी आबासाहेब जगदाळे, श्रीकांत भावठाणकर, हरिराम काकडे, बीभिषण चोले, अभिजित ठाकरे यांच्यासह हजारो स्पर्धा परिक्षा तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
Add new comment