बीडमध्ये विस्तार अधिकारी जगताप निलंबित, झेडपीचा दुसरा कर्मचारीही गोत्यात

बीड : बेरोजगारांकडून पैसे उकळून नोकरीची बनावट आॅर्डर दिल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेची नाहक बदनामी झाल्यामुळे आरोग्य विभागातील (सां.) विस्तार अधिकारी संतोष दिलीप जगताप याच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबनाची कारवाई केली. तर या प्रकरणातील जि. प. चा दुसरा कर्मचारीही गोत्यात आला आहे. या कर्मचा-याचे आणि त्या विस्तार अधिका-याच्या वैयक्तिक आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून सूड उगविण्यासाठी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले.

जिल्हा परिषदेच्या सांख्यिकी विभागातील कर्मचारी एस. डी. जगताप याने नोकरी मिळवून देतो म्हणून पैसे उकळून बनावट आॅर्डर दिल्याची व फसवणूक केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे नगर जिल्ह्यातील चार जणांनी केली होती. त्यानंतर पोलीसांनी जगताप यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत कळविण्याचे जि. प. ला पत्र दिले होते. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर काहीही संबंध नसताना जि. प. ची बदनामी झाल्याने जि. प. प्रशासनाने या संदर्भात जगताप यांस नोटीस बजावली होती. जगताप याने जि. प. कडे त्याचा खुलासा सादर केल्याचे समजते.

हा खुलासा सादर केल्यानंतर या प्रकरणात जगतापविरोधात मोहिम छेडणा-यांमागे जि. प. चा आगळे नामक कर्मचारी असल्याची बाब समोर येत आहे. तर आपण वर्ग तीन श्रेणीतील कर्मचारी असल्याने कोणत्याही भरती प्रक्रियेशी आपला संबंध येत नाही. माझ्या नातवाईकांनी हे वैयक्तिक हेवेदावे, द्वेषापोटी आपल्यावर कारवाई होऊन जि. प. मधील नोकरीवरुन कमी करण्याच्या हेतुने जाणीवपुर्वक खोटी तक्रार दिल्याचे जगताप यांचे म्हणणे आहे. ही तक्रारच बोगस असून एकाच व्यक्तीने इतरांच्या नावे खोट्या सह्या करुन तक्रार दिल्याचे या पत्रात म्हटले आहे.

ज्यांनी तक्रार केली आहे, ते आपले नातेवाईक व बीड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक ज्ञानेश्वर आगळे यांचे वहिनी, बहिण, मावसबहिण बंधू आहेत. त्यांनी सादर केलेले धनादेश हे दीड वर्षांपुर्वीचे असून संबंधितांना रोखीने पैसे दिल्याने दाद न मागता गैरफायदा घेऊन मला ब्लॅकमेल करुन बदनामी करत आहेत. जुन्या आर्थिक व्यवहारास अन्य स्वरुप देऊन जि. प. प्रशासनाची दिशाभूल करुन जि. प. ची बदनामी करत असल्याचे जगताप याचे म्हणणे आहे. आपल्याला फसविण्यासाठी तक्रारदारांनी झेरॉक्सचा वापर करुन बनावट कागदपत्र बनविलेले असू शकतात असा या पत्रात नमूद केले आहे.

वैयक्तिक आर्थिक वादातून घडलेला प्रकार
वैयक्तिक आर्थिक व्यवहार आणि वादातील हा प्रकार असल्याचे समोर येत असल्याने जि. प. ची बदनामी झाली म्हणून विस्तार अधिकारी एस.डी. जगतापवर निलंबनाची कारवाई झाली. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक ज्ञानेश्वर आगळे हा ही गोत्यात आला आहे. त्यामुळे जि. प. प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.