भुजबळ समर्थकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
मुंबई- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जर जाणीवपूर्वक अडकवले असल्यास त्यांना न्याय मिळणार नाही असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. दरम्यान, खडसेंनी असं वक्तव्य करून आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व ओबीसी समाजातील बडे प्रस्थ मानले जाणारे छगन भुजबळ जवळपास गेली दोन वर्षापासून तुरूंगात आहेत. भुजबळ यांना कायद्यानुसार जामीन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एसीबी आणि ईडी याबाबत काहीही करताना दिसत नाही. त्यामुळे भुजबळ समर्थकांनी सध्या भुजबळांच्या समर्थनार्थ 'अन्याय पे चर्चा' हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी भुजबळ समर्थकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.
एकनाथ खडसे म्हणाले, एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक अडकवले जात असल्यास त्याला न्याय कसा मिळेल?. खरं तर भुजबळांना कायद्याच्या चौकटीत यापूर्वीच न्याय मिळायला हवा होता पण तसे घडताना दिसले नाही. भुजबळ हे वर्षानुवर्ष बहुजन समाजासाठी काम करणारे नेते आहेत. मात्र, त्यांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का भोगावी लागत आहे असा सवाल करत आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. आपल्याला माहित असेलच की, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. तसेच ईडीसारख्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या सरकारच्या आदेशानेच काम करतात. त्यामुळेच खडसेंच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होते.
Add new comment