लाइव न्यूज़
तर भस्मसात करण्याचीही आपल्यात धमक, एकनाथ खडसेंचा इशारा
Beed Citizen | Updated: February 5, 2018 - 3:09pm
जळगाव (वृत्तसेवा) गेल्या काही दिवसांपासून आपल्याच पक्षाविरोधात वक्तव्ये करत नाराजी दर्शवणारे भाजपाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षाला इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आयोजित लेवा पाटीदार समाजाच्या मेळाव्यात त्यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा बोलून दाखवली. लेवा पाटीदार-पटेल समाजात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात ती होती, हे इतिहासात डोकवल्यास लक्षात येते. राजकारणात पात्र माणसाला केव्हा बाजूला सारले जाईल अन् पात्रता नसलेली व्यक्ती पुढे येईल याचा काही नेम नाही. आपल्यात जशी निर्माण करण्याची धमक आहे, तसेच ती भस्मसात करण्याचीही आहे, असा गर्भित इशाराच त्यांनी दिला.
हे व्यासपीठ सामाजिक आहे. त्यामुळे राजकीय विषय मांडणे योग्य वाटत नाही. मात्र, अन्याय झाला तर तो सहन न करता त्याच्याविरोधात आवाज उठवणे हा आपला स्थायिभाव असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेत आपल्या समाजाला विचारात घेतले पाहिजे, अशी ताकद दाखवावी लागेल. त्यासाठी राजकारणाचे जोडे बाजूला काढून संघटित होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, राज्यात कधीकाळी आक्रमक नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापासून जळगाव जिल्हयातील भाजप नेत्यांसह अनेक पदाधिकारीही हातचे अंतर ठेवू लागल्याने खडसेंची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्री जळगाव दौर्यावर आल्यावर नाथाभाऊ लवकरच मंत्रिमडळात परततील, असे सांगत टाळ्या मिळवून निघून जातात. परंतु, आगामी वाट बिकट असल्याची जाणीव खडसेंना झाल्याने महिनाभरापासून ते देखील आक्रमक झाले आहेत. खडसेंसाठी आता लेवा पाटीदार समाज मैदानात उतरला आहे. लेवा पाटीदार समाजाच्या कार्यकर्त्यांनी खडसेंच्या समर्थनार्थ मुंबईत निदर्शने केली होती.
Add new comment