बालरंगभूमीचा आधारवड हरपला; सुधाताईंचं निधन

मुंबई (वृत्तसेवा) बालरंगभूमीच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यासाठी संपूर्ण जीवन वाहणार्‍या, ज्यांच्याशिवाय बालरंगभूमीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही आणि बालरंगभूमीच्या आधारवड अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. सुधा करमरकर यांनी ’मुंबई मराठी साहित्य संघा’च्या सहकार्याने १९५९ मध्ये ’लिटिल थिएटर’ची स्थापना केली होती. लिटिल थिएटरतर्फे ’मधुमंजिरी’ हे पहिलं बालनाट्य सादर केलं होतं. ते खूप गाजलं. त्याचं लेखन रत्नाकर मतकरी यांनी आणि दिग्दर्शन सुधाताईंनी केलं होतं. याशिवाय त्यांनी साकारलेली ’चेटकिणी’ची भूमिका विशेष गाजली. 
सुधाताईंचा जन्म १९३४ साली मुंबईत झाला. वडील तात्या आमोणकर हे साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न असल्यानं त्यांना घरातूनच नाट्यसेवेचं बाळकडू मिळालं होतं. वयाच्या १८व्या वर्षी त्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात प्रवीण झाल्या होत्या. त्यांनी ’रंभा’ या नाटकात साकारलेली रंभेची भूमिका खूप गाजली. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला होता. आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेतील ’उद्याचा संसार’ या नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सुधाताईंना मिळालं होतं.  सुधाताईंनी बालरंगभूमीसाठी दिलेलं योगदान खूप मोठं होतं. लिटिल थिएटरच्या माध्यमातून त्यांनी अनेक बालनाट्ये सादर केली. त्यांनीच या बालनाट्यांचं दिग्दर्शन केलं होतं. ’चिनी बदाम’, ’अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’, ’अलिबाबा आणि चाळीस चोर’, ’जादूचा वेल’, ’गणपती बाप्पा मोरया’, ’कळलाव्या कांद्याची कहाणी’, अशी अनेक बालनाट्ये त्यांनी सादर केली. व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांनी काम केलं होतं. ’विकत घेतला न्याय’, ’तो राजहंस एक’, ’तुझे आहे तुजपाशी’, ’थँक्यू मि. ग्लाड’, ’पुत्रकामेष्टी’, ’बेईमान’, ’रायगडाला जेव्हा जाग येते’, ’पती गेले गं काठेवाडी’, ’वीज म्हणाली धरतीला’, ’अश्रूंची झाली फुले’, अशा व्यावसायिक नाटकांतूनही त्यांनी काम केलं. त्यांना २०१२ साली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.