शानदार विजयासह सिंधूची अंतिम फेरीत धडक
इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा
भारताचे आशास्थान असलेल्या पी.व्ही.सिंधूने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिलांच्या एकेरीची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत तिने रात्चानोक इन्तानोनचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. भारताच्या प्रणव जेरी चोप्रा व एन.सिक्की रेड्डी यांना मिश्र दुहेरीत पराभव स्वीकारावा लागला.
सिंधूविरुद्ध इन्तानोनने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला आघाडी घेतली होती. परंतु नंतर सिंधूने स्मॅशिंगचे जोरकस फटके व कॉर्नरजवळ प्लेसिंग असा खेळ करीत आघाडी घेतली. आघाडी मिळाल्यानंतर तिने खेळावर नियंत्रण घेतले. हा गेम तिने २० मिनिटांमध्ये घेतला. इन्तानोनचे पिछाडी भरून काढण्याचे प्रयत्न असफल ठरले. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. तिची आघाडी कमी करण्याचा इन्तानोनने प्रयत्न केला. तिने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला. पण सिंधूने स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा घेत सतत आघाडी राखली. हळूहळू ही आघाडी वाढवित तिने दुसऱ्या गेमसह सामना जिंकला. तिने बॅकहँडचेही अप्रतिम फटके मारले. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत झांग बेईवेनने च्युंग निगेनवुईचा १४-२१, २१-१२, २१-१९ असा पराभव केला. पहिला गेम गमावल्यानंतर तिने परतीचे फटके व प्लेसिंगवर नियंत्रण मिळवत विजयश्री खेचून आणली.
Add new comment