लाइव न्यूज़
शहराला जोडणार्या दगडी पुलाची उंची वाढविण्याची मागणी
Beed Citizen | Updated: February 4, 2018 - 2:54pm
बीड (प्रतिनिधी) शहरातून जाणार्या बार्शी पुलाचे राजकारण जिल्ह्यात गाजले. पुल पाडण्यापासून मंजूरीचे श्रेय घेण्यापर्यंत पत्रक काढण्यात आली. परंतू शहराच्या मध्यवस्तीतून जाणार्या निजामकालीन दगडी पुलाला दोनशे वर्षाचा कालावधी लोटला. तरीही या पुलाकडे पाहण्यास कोणत्याही राजकीय सामाजिक व्यक्तींना वेळ मिळत नसल्याने सामान्य नागरीक पुलाला पर्यायी पुल तसेच या निजाम कालीन पुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
शहराला जोडण्यासाठी दोनशे वर्षापूर्वी निजामकालीन सरकारने प्रसिध्द कंकालेश्वर मंदिराच्या बाजुने वाहणार्या बिंदुसरा नदीवर दगडी पुलाचे बांधकाम चोख पध्दतीने केले. दोनशे वर्षानंतरही त्याच परिस्थितीत दगडी पुल उभा आहे. पेठ बीड भाग व शहर वासियांना जोडणारा हा महत्वाचा दुवा मानला गेला. कालांतराने डॉ.बाबासाहेब आंबेेडकर यांच्या पुतळ्यासमोरून मोठे पुल उभारण्यात आले. दगडी पुलाला पर्यायी व्यवस्था म्हणून या पुलाकडे पाहिले गेले. परंतू आजही दगडी पुलावरून ये-जा करणार्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. दगडी पुलाशेजारी प्रसिध्द कंकालेश्वर मंदिर, हजरत शहेंशाहवली दर्गाह, आठवडी बाजार सारखे प्रसिध्द ठिकाण आहे. यामुळे याठिकाणी व्यापारी वर्ग ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतो. परंतू शंभर वर्ष पूर्ण झालेल्या बार्शी नाका पुलाला प्रशासकीय मान्यता देत काम चालु केले गेले. परंतू दोनशे वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या दगडी पुल दुर्लक्षीतच आहे. मागील काही वर्षात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महापुराची परिस्थिती निर्माण झाली. सर्वात आधी महापुराचा फटका दगडी पुलाला बसतो. पुलाची उंची जेमतेम असल्याने पुलावरून पावसाचे पाणी तात्काळ वाहु लागते. यामुळे या परिसरातील नागरीकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. दगडी पुलाची परिस्थिती मजबुत असली तरी उंची वाढविण्याची किंवा पर्यायी पुलाची व्यवस्था होणे आवश्यक आहे. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षीत केल्याने पेठ बीड भागातील नागरीकांच्या जिवाशी प्रशासन खेळत असल्याची भावना निर्माण होत आहे. दगडी पुलाला पर्यायी पुल किंवा उंची वाढविण्याची मागणी परिसरातील नागरीकांच्यावतीने होत आहे.
Add new comment