अन्याय झालाच असेल तर आमचे आम्ही पाहून घेऊ पंकजाताईंचे धनंजय मुंडेंना उत्तर

 पिंपरी चिंचवड, (प्रतिनिधी):- दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला असेल तर ते आमचं आम्ही पाहून घेऊ, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.‘आठवणीतले गोपीनाथ मुंडे’ या कार्यक्रमाचं पिंपरीत आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘मी भावनिक नाही, पण भावनेने राजकारण करते’, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडे साहेबांना मानत असलेल्या वर्गाला आपलंसं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.
‘‘गोपीनाथ मुंडेंवर भाजपवाल्यांनी अन्याय केला आणि खापर आपल्या माथी फोडलं’’, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी ११ जानेवारी रोजी जालन्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यात बोलताना केलं होतं. त्याला पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं.‘‘भाजपवाले लबाड असून त्यांनी कोणालाच सोडलं नाही. ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजप वाड्या-वस्ती, तांड्यांवर वाढवला. ते हयात असताना भाजपने काय त्रास दिला हे सर्वांना माहित आहे. त्रास भाजपने दिला, मात्र त्याचं खापर माझ्या माथी फोडलं,’’ असं धनंजय मुंडे म्हणाले होते.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना लोकांनी झोळी फाटेपर्यंत प्रेम दिलं. सर्व सामान्यांना ते आपले वाटायचे, आजही ते तितकेच लोकप्रिय आहेत.  माझ्या वागण्या- बोलण्यात त्यांची आठवण होत नसेल तर त्या जगण्याला अर्थ नाही. माझं आयुष्यही त्यांच्यापेक्षा वेगळ नाही, एक पिता व नेता म्हणून त्यांनी मला खूप काही शिकवलं, त्यामुळे  लोकांच्या आठवणीतील मुंडे साहेब मला व्हायचयं अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मुंडे साहेबांविषयी आपल्या आठवणी ताज्या केल्या.   लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड येथील थोपटे लॉन्स येथे भाजप नेते सदाशिव खाडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ’आठवणीतील मुंडे साहेब’ या कार्यक्रमात ना पंकजाताई मुंडे बोलत होत्या. डॉ. अमित पालवे,  खा. अमर साबळे, आ. महेश लांडगे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, उप महापौर शैलजा मोरे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, सुनील कर्जतकर, उमा खापरे, आळंदीच्या नगराध्यक्षा  वैजयंती उमरगेकर सचिन पटवर्धन, किरण गिते आदी यावेळी उपस्थित होते. ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या    भाषणात मुंडे साहेबांचा राजकीय प्रवास, लोकांसाठी काम करण्याची तळमळ, त्यांचा निर्भिडपणा, कुटूंबवत्सलता, संयम, सहनशीलता या त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकल्याने वातावरण भारावून गेले होते.  याप्रसंगी खा. अमर साबळे, गोविंदराव केंद्रे, अमर पटवर्धन, मुक्ता टिळक, वैजयंती उमरगेकर, सदाशिव खाडे यांनी मनोगत करताना मुंडे साहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशोक मुंडे, रघुनंदन घुले, केशव घोळवे आदीनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.  शहरातील नागरिकांनी कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती.
--

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.