टेम्पोच्या धडकेत विद्यार्थी ठार होताच चालकाने केली आत्महत्या ; पश्चातापाने अपघातानंतर काही वेळातच घेतला गळफास
बीड ( प्रतिनिधी ) टेम्पोच्या धडकेत विद्यार्थी ठार झाल्याचा धक्का सहन न झाल्याने टेम्पो चालकाने आत्महत्या केली. अपघात घडल्यानंतर काही वेळातच पश्चातापाने त्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. अपघात आणि त्यातून आत्महत्याच्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
बरड फाटा (ता.केज) येथे शनिवारी दुपारी बारावीची प्रात्यक्षिक परिक्षा देवून घराकडे जात असतांनाच विकास अशोक ठोंबरे (18 रा. नांदूरफाटा ) याच्या मोटारसायकल क्र.(एम.एच.23 आर.4804 ) ला टेम्पो क्र.(एम.एच.23- 7508 )ने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात विकास ठोंबरे याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काही वेळात तेथून जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन टेम्पो चालक अशोक आत्माराम कानडे ( 28 , रा चाकरवाडी ता. बीड ) याने आत्महत्या केली. आपल्या टेम्पोने विद्यार्थी ठार झाल्याचा धक्का सहन न झाल्याने पाश्चातापातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मयत अशोक कानडे यास एक बारा वर्षीय मुलगी, सात वर्षांचा मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. एकाच घटनेतून दोघांना प्राण गमवावे लागले या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Add new comment